अभ्यास दौऱ्याला सहा संचालक रवाना; बहुतांश नाखूश
By Admin | Updated: October 13, 2015 23:45 IST2015-10-13T23:43:59+5:302015-10-13T23:45:54+5:30
जिल्हा बॅँक : पत्रप्रपंचाचा खर्च गेला पाच लाखांवर?

अभ्यास दौऱ्याला सहा संचालक रवाना; बहुतांश नाखूश
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ग्रामीण भागातील शाखांवर एका मागून एक ‘दरोडे’
पडत असताना जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे मात्र आपल्या संचालकांना घेऊन काल (दि. १३) सातारा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी रवाना झाले.
विशेष म्हणजे या दौऱ्याकडे डझनभर संचालकांनी पाठ फिरविली असून, आपल्या बॅँकेची सुरक्षा सांभाळायची सोडून अधिकच्या वसुलीसाठीचा अभ्यास करण्याचा दौरा करणे म्हणजे पैसे व वेळ वाया घालविण्यासारखेच असल्याचे काही संचालकांचे म्हणणे आहे. त्यातही ज्यांना वसुली करायची त्या कार्यकारी संचालकांसह विभागीय निरीक्षक व वसुली अधिकाऱ्यांसाठी नाशिकलाच तीन ते चार दिवसांचे प्रशिक्षण सातारा येथील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे ठेवले असते, तर ते अधिक फायदेशीर ठरले असते. तसेच जिल्ह्णासह राज्यात
दुष्काळाची परिस्थिती असताना अशा अभ्यास दौऱ्यावर बॅँकेचा खर्च का करायचा, असे काही संचालकांचे म्हणणे आहे.
काल सकाळीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या द्वारका येथील मुख्य शाखेच्या आवारात अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, गणपतराव पाटील, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर, संचालक नामदेव हलकंदर, धनंजय पवार, कार्यकारी संचालक सुभाष देसले आदि सातारा येथे रवाना झाले. काल सायंकाळी उशिरा मुंबईहून ज्येष्ठ संचालक माजी आमदार माणिकराव कोकाटे व आमदार सीमा हिरे, तर येवल्याहून किशोर दराडे या दौऱ्यात सहभागी होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.(प्रतिनिधी)