क्रीडा संकुलासाठी सहा कोटींचे अनुदान

By Admin | Updated: February 12, 2016 23:37 IST2016-02-12T23:37:09+5:302016-02-12T23:37:25+5:30

मनपाला ७५ लाखांचे दायित्व : येत्या महासभेत प्रस्ताव

Six crores grant for sports complex | क्रीडा संकुलासाठी सहा कोटींचे अनुदान

क्रीडा संकुलासाठी सहा कोटींचे अनुदान

नाशिक : दसक शिवारात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या सुमारे ७५८९ चौ.मी. क्षेत्रात केंद्र सरकारच्या शहरी क्रीडा सुविधा योजनेअंतर्गत ६.७५ कोटी रुपये खर्चाचे छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बांधण्यासाठी सरकारकडून ६ कोटी रुपये अनुदान मिळणार असून उर्वरित ७५ लाख रुपये महापालिकेला खर्च करावे लागणार आहेत. सदर खर्चाला मंजुरी मिळण्यासाठी प्रशासनाकडून येत्या मंगळवारी (दि.१६) होणाऱ्या महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात ४८ बाय ४० मीटरचे इनडोअर स्टेडियम बांधण्यात येणार असून त्यात ३४ बाय ३६ मीटर आकाराच्या सिंथेटिक कोर्टचाही अंतर्भाव असणार आहे. याशिवाय, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलिबॉल यांचे कोर्ट, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र जिम्नॅशियम हॉल, कॅरम, टेबल टेनिस यासाठी क्रीडा सुविधा व प्रेक्षक गॅलरीचा समावेश आहे. या क्रीडा संकुलासाठी महापालिकेने ६.७५ कोटी खर्चाकरिता अनुदान मिळण्याचा प्रस्ताव एप्रिल २०१५ मध्ये केंद्र सरकारला सादर केला होता. केंद्र सरकारने सदर प्रस्तावात काही अटी-शर्तींवर ६ कोटी रुपये अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे उर्वरित ७५ लाख रुपयांचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
क्रीडा संकुल पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही महापालिकेलाच करावी लागणार आहे. तसा करार महापालिकेला केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाशी करावा लागणार आहे. ७५ लाखांचा खर्च आणि केंद्र सरकारसोबत करण्यात येणाऱ्या करारनाम्याविषयी मान्यता मिळण्याचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या महासभेत ठेवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Six crores grant for sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.