नांदगावी भावाकडून बहिणीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:43 IST2017-07-18T00:43:14+5:302017-07-18T00:43:25+5:30
नांदगावी भावाकडून बहिणीचा खून

नांदगावी भावाकडून बहिणीचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : शेतात निंदणीचे काम करत असलेल्या बहिणीवर दगड मारून व तिच्या छातीत लाथा मारून तिचा खून केल्याची घटना मूळडोंगरी येथे घडली. या प्रकरणी आईने मुलाविरुद्ध नांदगाव पोलिसात फिर्याद दिली आहे.
मयत आरती दादा मुकणे (१७) ही तिच्या पतीच्या घरी नांदायला न जाता तिची मोठी बहीण बायटी हिची सवत म्हणून राहत असल्याचा राग येऊन आरतीच्या भावाने तिचा काटा काढला. आरतीचा भाऊ राजू रंगनाथ मुकणे याने आरती शेतात निंदणी करत असताना हातात दगड घेऊन तू येथे कशाला आली, असे विचारले. तेव्हा आरतीने मी पतीकडे जात नाही. बायटीची सवत म्हणून राहते असे सांगितले. याचा राग येऊन राजू याने शेतातला दगड घेऊन तिच्या पाठीत जोरात मारला. ती जमिनीवर पडल्यावर तिच्या छातीत लाथा मारून तिचा खून केला.
दुपारी लहान भाऊ राजू हा शेतात गेला व आपल्या बहिणीला इकडे शेतात का आणले म्हणून बायकोला व आईला त्याने सुरुवातीला मारहाण केली व त्यानंतर हातातील मोठा दगड बहिणीच्या दिशेने मारून फेकला. आई सोन्यावाई हिने मुलगा राजू याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली आहे. बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या भावाच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पदमने, रमेश पवार, पंकज देवकाते आदींच्या पथकाने मूळडोंगरी व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. मात्र अद्यापही राजू मुकणे पोलिसांच्या हाती लागलेला नाही.आरती मुकणे ही अलीकडेच काही दिवसांपूर्वी पुण्याहून आपल्या मोठ्या भावाकडे रणखेडा, ता. नांदगाव येथे आली. मोठ्या भावाने तिला मूळडोंगरीच्या ज्ञानेशवरनगर येथे लहान भावाकडे पाठविले होते. दुपारी आरती आई, वडील व आपल्या भावजयीसोबत बाजरी निंदण्यासाठी शेतात आली होती.