सिन्नरला युवकाचा भोसकून खून
By Admin | Updated: May 1, 2017 01:22 IST2017-05-01T01:22:27+5:302017-05-01T01:22:36+5:30
सिन्नर : मुलीशी प्रेमसंबंध असल्याने तिचा विवाह जुळविण्यात अडचण निर्माण करीत असल्याच्या संशयावरून युवकाच्या छातीत शस्त्र भोसकून खून केल्याची घटना घडली

सिन्नरला युवकाचा भोसकून खून
सिन्नर : मुलीशी प्रेमसंबंध असल्याने तिचा विवाह जुळविण्यात अडचण निर्माण करीत असल्याच्या संशयावरून युवकाच्या छातीत धारदार शस्त्र भोसकून व डोक्यावर फरशी, रॉडने वार करुन त्याचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. शहरातील झापवाडी रस्त्यावर मॉडर्न कॉलनीच्या विघ्नहर्ता चौकात घडलेल्या या घटनेमुळे सिन्नर शहर हादरले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.
येथील मॉडर्न कॉलनीत सावंत व भांगरे कुटुंबीय राहतात. मयत गणेश बाबूराव सावंत (२६) याचे भांगरे कुटुंबातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भांगरे कुटुंबीयांना होता. त्यातून मयत गणेश हा विवाह जुळवितांना अडचणी निर्माण करीत असल्याचा संशय भांगरे कुटुंबीयांना होता. त्यातून दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद झाले होते. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उभय कुटुंबीयांमध्ये वाद झाल्यानंतर ते मिटविण्यात आले होते. पुन्हा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश बाबूराव सावंत याच्या डोक्यात भांगरे कुटुंबातील सदस्यांनी रॉड व फरशीने घाव टाकले. त्याचबरोबर चाकू छातीच्या उजव्या भागात भोसकला. यात गणेश सावंत याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे, निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याच्या सूचना केल्या. या पाचही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर महिला संशयितांना दोन मेपर्यंत तर तिघा पुरुष संशयितांना ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक निसार सय्यद, हवालदार शहाजी शिंदे अधिक तपास करीत आहे. (वार्ताहर)