स्वच्छ शहरासाठी सरसावले सिन्नरकर
By Admin | Updated: January 9, 2016 23:02 IST2016-01-09T22:56:35+5:302016-01-09T23:02:03+5:30
जनजागृती : अपर जिल्हाधिकाऱ्यांसह पदाधिकारी सहभाग

स्वच्छ शहरासाठी सरसावले सिन्नरकर
सिन्नर : स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सिन्नर नगरपालिकेच्या वतीने शनिवारी सकाळी गावातून जनजागृती फेरी काढून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अपर जिल्हाधिकारी अनुराज बगाटे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, नगराध्यक्ष अश्विनी देशमुख यांच्यासह पालिका पदाधिकारी, अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील नागरिकांनी स्वच्छता ठेवून आरोग्याला जपावे, यासाठी पालिका कार्यालयापासून सकाळी प्रबोधन फेरी काढण्यात आली. सिन्नर महाविद्यालयासह महात्मा जोतिबा फुले, भिकुसा विद्यालय, चांडक कन्या विद्यालय व ब. ना. सारडा विद्यालयाचे विद्यार्थी या जनजागृती फेरीत सहभागी झाले होते. हातात स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगणारे फलक व विविध घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.
शिवाजी चौकात अपर जिल्हाधिकारी बगाटे, प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, नगराध्यक्ष देशमुख, उपनगराध्यक्ष संजय नवसे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जाधव, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्यासह नगरसेवक व अधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून सांगतानाच सिन्नरकरांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. शिवाजी चौक, गणेश पेठ, गंगा वेस, खडकपुरा भागातून पालिका कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील प्रबोधनात्मक फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सिन्नरकरांना मार्गदर्शन केले. पालिकेने काढलेल्या स्वच्छता अभियान रॅलीत माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय जाधव, नगरसेवक बापू गोजरे, मल्लू पाबळे, हर्षद देशमुख, लता मुंडे, लता हिले,मंगला जाधव, राजश्री कपोते, उज्ज्वला खालकर, शुभांगी झगडे, अविनाश कपोते, सुनील पाटील, नितीन परदेशी, अनुष गुजराथी, दीपक भाटजिरे, राजेंद्र आंबेकर, दिलीप गोजरे, दामू भांगरे, रवींद्र देशमुख, जावेद सय्यद, प्रियंका गांगुर्डे, दीपाली चौटे, सुनील शिंदे यांच्यासह विविध विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.