‘स्वरराज’च्या सुरांनी सिन्नरकर चिंब
By Admin | Updated: November 16, 2015 00:16 IST2015-11-16T00:15:33+5:302015-11-16T00:16:14+5:30
पाडवा पहाट : श्री सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रम

‘स्वरराज’च्या सुरांनी सिन्नरकर चिंब
पाडवा पहाट : श्री सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रम ‘स्वरराज’च्या सुरांनी सिन्नरकर चिंबसिन्नर : येथील मातोश्री नर्मदा लॉन्सच्या हिरवळीवर पाडवा पहाटनिमित्ताने गुरुवारी ‘स्वरराज’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रात:कालच्या प्रसन्न वातावरणात प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे या पितापुत्र जोडीने सादर केलेल्या सुरांच्या शृंखलेत सिन्नरकर रसिकश्रोते चिंब झाले.
श्री सांस्कृतिक मंचच्या वतीने पाडवा पहाटनिमित्ताने आयोजित या कार्यक्रमास आद्यदेवता गणरायास वंदन करून सुरुवात करण्यात आली. सरस्वतीची प्रार्थना, गुरुवंदनेने या संगीतमय पहाटेचा पूर्वार्ध रंगला. भुपाळी, अभंग व देवीच्या गोंधळापासून गवळणींपर्यंत, भक्तिगीतांपासून कोळीगीतांपर्यंत अनेक नवी-जुनी लोकप्रिय गीते सादर करण्यात आली. ‘पुन्हा एकदा’चा आग्रह आणि टाळ्या-शिट्ट्यांच्या उदंड प्रतिसादात प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
पहाटेच्या मंगलमय प्रसन्न वातावरणात ‘दान पावलं’चा गजर करत येणारा वासुदेव, देवीचा गोंधळ या गीतांवर स्वरराजच्या टीमने सादर केलेल्या नृत्याविष्काराला सिन्नरकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.
लल्लाटी भंडार, जय जय महाराष्ट्र माझा, माउली-माउली, माझे माहेर पंढरी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या भक्तिगीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रथम तुज पाहता जीव वेडावला, मधुबन में राधिका नाचे रे, डोलकंर दर्याचा राजा, बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, डिपाडी ढिपांग या गीतांनी सिन्नरकरांची मने जिंकली. देव एका पायाने लंगडा, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी या गवळणींना सिन्नरकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
याप्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती अॅड. नितीन ठाकरे, वणी येथील सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त उन्मेष गायधनी, सिन्नर पंचायत समितीचे गटनेते उदय सांगळे आदि मान्यवर उपस्थित होते. उद्योजक लालाशेठ चांडक, पुंजाभाऊ सांगळे, सिन्नर वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत, बाळासाहेब चकोर, राजेंद्र देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. (वार्ताहर)