सिन्नरला शेतकरी सन्मान मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:15 IST2020-12-31T04:15:47+5:302020-12-31T04:15:47+5:30
----------------- सिन्नरला सेवा दलाचा दल दिन सिन्नर: राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सेवा दलाचा दल दिन हुतात्मा स्मारक येथे साजरा ...

सिन्नरला शेतकरी सन्मान मेळावा
-----------------
सिन्नरला सेवा दलाचा दल दिन
सिन्नर: राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सेवा दलाचा दल दिन हुतात्मा स्मारक येथे साजरा करण्यात आला. सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांच्या हस्ते ध्वज दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ सदस्य वसंतबाबा नाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सेवा दलाच्या कला पथकाद्वारे राज्यभर केलेल्या कार्यक्रमांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर, खरा तो एकची धर्म या साने गुरुजींच्या प्रार्थनेचे सामूहिक पठण करण्यात आले.
----------------
गुजराथी यांना शोकसभेतून अभिवादन
सिन्नर: जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा, दिशादर्शक पद्माकर गुजराथी यांच्यासारखा ज्येष्ठ नेता सिन्नरकरांनी गमवल्याची भावना सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शोकसभेत व्यक्त केली. भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी यांच्या निधनानंतर सार्वजनिक वाचनालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ उद्योजक पुंजाभाऊ सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोेकसभेस सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------------
पंचाळे-कोळपेवाडी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पंचाळे-कोळपेवाडी या रस्त्याची दुरवस्था झाली असून, त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मार्गाने कारखान्यात जाणारे चाकरमान्यांसह या रस्त्याने मोठी वर्दळ असते. सिन्नरला जाण्यासाठी या मार्गाने कामगार व मजूर जात असतात. पंचाळे ते शहा या मार्गावरील रस्ता जास्त खराब झाला असून, त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-------------
महिनाभरात पाच बिबटे जेरबंद
सिन्नर: गेल्या महिन्याभरात तालुक्यात पाच बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिबटे शेतकऱ्यांच्या वस्तीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. धुळवड, निमगाव-देवपूरसह पाच ठिकाणी वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करून त्यांच्या अधिवासात सोडून दिले आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असून, वनविभगाला डोकेदुखी वाढली आहे.