सिन्नर, चांदवड महिलांसाठी राखीव
By Admin | Updated: September 3, 2014 00:29 IST2014-09-03T00:29:30+5:302014-09-03T00:29:30+5:30
पंचायत समिती सभापतिपद सोडत : देवळा, मालेगाव सर्वसाधारण

सिन्नर, चांदवड महिलांसाठी राखीव
नाशिक : येत्या १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पंचायत समिती सभापतिपदासाठीची सोडत मंगळवारी (दि.२) जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आली असून, देवळा व मालेगाव प्रथमच सर्वसाधारण संवर्गासाठी खुले झाले असून, सिन्नर आणि चांदवड पंचायत समित्यांचे आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव झाले आहे.
नाशिक, नांदगावसह काही पंचायत समित्यांचा सभापती निवडीचा बिनविरोध मार्ग मोकळा झाल्याची किमया या आरक्षणातून साधली गेली आहे. कारण या संवर्गातील एकमेव उमेदवार संबंधित पंचायत समितीत असल्याने सभापतिपदाची बिनविरोध माळ नांदगावमधून श्रीमती सोनवणे, तर नाशिकमधून राष्ट्रवादीच्या मंदाबाई निकम यांच्या गळ्यात पडणार आहे.
नियोजन भवनात या आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात आली. सर्वात आधी अनुसूचित जमाती संवर्गातील महिला राखीवसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात पेठ, दिंडोरी व कळवणमध्ये याआधी महिला आरक्षण नसल्याने तेथे चक्राकार आरक्षणानुसार महिला राखीव संवर्ग ठेवण्यात आला, तर बागलाण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी यापैकी एका पंचायत समितीसाठी चिठ्ठीद्वारे महिला राखीव आरक्षण काढण्यात आले. चिठ्ठीत बागलाणसाठी अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षणाची सोडत निघाली. अनुसूचित जमाती महिला संवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात सर्वाधिक लोकसंख्या नांदगाव तालुक्यात असल्याने नांदगाव पंचायत समितीचे अनुसूचित जमाती महिला, तर अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या येवला पंचायत समितीत अनुसूचित जाती महिला संवर्गाचे आरक्षण चक्राकारनुसार जाहीर करण्यात आले.
यावेळी आरक्षण सोडतीसाठी उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई, नायब तहसीलदार अनिल शेटे यांनी प्रक्रिया राबविण्यास मदत केली, तर पंचायत समिती सभापती अनिल ढिकले, बाळासाहेब वाघ, विलास अहेर, जिल्हा परिषद सभापती राजेश नवाळे, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, पंचायत समिती सदस्य सुभाष कराड, गोपाळ लहांगे, शांताराम मुळाणे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)
इन्फो..
तेजश्री धनवान
आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविताना चिठ्ठी काढणारी मुक्तांगण शाळेची चिमुकली विद्यार्थिनी तेजश्री रामदास खैरनार हिने नाशिक पंचायत समितीचे आरक्षण ओबीसी महिला राखीव काढताच हर्षोल्लित झालेले पंचायत समिती सदस्य मंदाबाई निकम यांच्या पती व चिरंजीवाने तेजश्रीच्या हातात बक्षिसी म्हणून रोख रक्कम दिली. नाशिक प्रमाणेच सुरगाणा पंचायत समितीचे आरक्षण अनुसूचित जमाती पुरुष निघाल्याने माजी आमदार जे. पी. गावित यांचे चिरंजीव इंद्रजित गावित यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरगाण्यात माकपचे बहुमत आहे, तर निफाड पंचायत समितीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग निघाला असून, त्यासाठी राष्ट्रवादीतून प्रबळ दावेदार सुभाष कराड असल्याने नियोजन भवनात त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.
(प्रतिनिधी)