सिन्नरला बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 16:52 IST2018-09-12T16:51:54+5:302018-09-12T16:52:35+5:30
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने सिन्नर शहरातील बाजारपेठ सजली आहे.

सिन्नरला बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज
बाजारपेठेत गणरायाची विविध रूपे आकर्षक मूर्तीच्या स्वरूपात भक्तांसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणरायाच्या मूर्तींनाही बाजारपेठेत मागणी असल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी वेगवेगळ्या रंगसंगतीतील लहान-मोठे मखर विक्रीस आले आहेत. त्यामध्ये चौरंग, मूषक वाहक रथ, सिंहासन, कमळ यांसारख्या मखरांना विशेष मागणी आहे. याशिवाय छोटी मोठी कलात्मक झाडे, रंगीबेरंगी फुले, प्लॅस्टिक फुलांचे हार, तोरण यांसह विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूही मुबलक प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. तसेच गणपतीसाठी खास फेटा, नक्षीकाम केलेले उपकरणे, विविध प्रकारचे हार, मोत्यांचे हार, मुकुट, रंगीत खडे आणि क्रिस्टलने बनविलेले आकर्षक दागिने बाजारात विक्रीसाठी आले आहेत. निसर्गप्रेमींसाठी खास इकोफ्रेंडली मखर, सिंहासने बाजारात दाखल झाली आहेत. लाकडी सिंहासने, नक्षीदार आरास यामुळे पर्यावरणपूरक सजावटीसाठी या वस्तूंना मोठी मागणी होत आहे. मखर २५० रुपये ते ३ हजार रुपयांपर्यंत प्लॅस्टिकची फुले ९० ते २५० रुपये, हार ५० ते २५० रुपये, छोटी कलात्मक झाडे २५ ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सजावटीच्या साहित्याच्या किमतीमध्ये सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. खास लाइट इफेक्ट असणारी थर्माकोलचे मखर भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. बाप्पा मोरयाची पट्टी, टोपी, भगवे झेंडे अशा अनेक वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. घरोघरी गणेश आगमनाची तयारी सुरू तर आहेच पण यावर्षी आरास कशी आकर्षक करता येईल, याबाबत अनेक तरुण मंडळांमधूनही मंडप उभारणी तसेच सजावटीची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.