सिन्नर नगरपालिका प्रशासन ढिम्मच

By Admin | Updated: May 24, 2014 12:09 IST2014-05-24T00:08:10+5:302014-05-24T12:09:42+5:30

सिन्नर : येथील गावठा भागातील सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूची गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले आहे.

Sinnar Municipality Administration Dhimch | सिन्नर नगरपालिका प्रशासन ढिम्मच

सिन्नर नगरपालिका प्रशासन ढिम्मच

सिन्नर : येथील गावठा भागातील सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूची गटार तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे नागरिकांची ये-जा करताना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजीनगर भागातील गटारीचे पाणी सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूने जाते. सदर गटारीवर या भागात तीन चेंबर काढण्यात आले आहेत. एक चेंबर या भागातील हिरो होंडा शोरूमच्या कंपाउण्डमध्ये आहे. अनेकदा सफाई कामगार आल्यानंतर गेट बंद असल्याने या भागातील चेंबरची साफसफाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पुढे सिद्धिविनायक व पाटील हॉस्पिटलजवळच्या चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात दवाखन्याचा कचरा, ओले नारळ पडलेले असतात. त्यामुळे गटार तुंबून पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली आहे. रस्त्यावर पाणी येण्याचा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. पालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांकडून गटारीचे काम करण्याचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीचे पाणी वीज रोहित्राखाली साचते. त्यामुळे धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत महिलांनी तक्रार केल्यानंतर नगरसेवक उज्ज्वला खालकर व पालिकेच्या काही कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र दरवेळी तक्रार केल्यानंतर पदाधिकारी व कर्मचारी केवळ पाहणी करून जातात. त्यावर कोणताही तोडगा काढला जात नसल्याचे महिला व या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना ये-जा करणेही मुश्कील होते. पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी गटारीचा प्रश्न तडीस लावण्याची मागणी वर्षा सोनवणे, सुरेखा शिंदे, इंदुमती पवार यांच्यासह महिलांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Sinnar Municipality Administration Dhimch