सिन्नरला बालेकिल्ल्यानेच वाजेंसाठी रचला इतिहास
By Admin | Updated: October 21, 2014 01:56 IST2014-10-21T01:28:36+5:302014-10-21T01:56:34+5:30
सिन्नरला बालेकिल्ल्यानेच वाजेंसाठी रचला इतिहास

सिन्नरला बालेकिल्ल्यानेच वाजेंसाठी रचला इतिहास
सिन्नर : दुरंगी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी भाजपाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यावर एकतर्फी विजय
मिळविला; त्यात सिन्नर शहरासह पश्चिम पट्ट्यातील मतदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोकाटे यांच्या पूर्वभागातील बालेकिल्ल्यात फूटतूट झाल्याचे दिसून आले, तर पश्चिम पट्ट्यातील वाजे यांचा बालेकिल्ला गेल्या निवडणुकीपेक्षाही अधिक भरभक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला. पश्चिम पट्ट्याने वाजे यांना भरघोस मताधिक्य देऊन विजयाचा इतिहास रचल्याचे आकडेवारीहून दिसून येते.
माणिकराव कोकाटे पूर्वभागातील असल्याने गेल्या पंधरा वर्षांपासून हा भाग कोकाटे यांची भरभक्कम पाठराखण करीत होता. मात्र, या निवडणुकीत कोकाटे
यांच्या पाठीशी पूर्वभाग पूर्ण ताकदीनिशी नसल्याचे दिसून
आले. गेल्या निवडणुकीत कोकाटे यांना पूर्वभागातून मिळालेली आघाडी पश्चिम पट्ट्याला मोडणे शक्य झाले नव्हते. मात्र, या निवडणुकीत पश्चिम पट्ट्याने पूर्वभागातील कोकाटे यांचे अल्पसे मताधिक्य मोडून वाजे यांना भरभक्कम आघाडी दिली. टाकेद गटानेही गेल्या निवडणुकीत कोकाटे यांना साथ दिली होती.
यावेळी टाकेद गट वाजे यांच्या पाठीशी राहिला. या निवडणुकीत कोकाटे यांना पूर्वभागातून म्हणावी तेवढी आघाडी राखता आली नाही. याउलट वाजे यांच्या पाठीशी पश्चिम पट्टा पूर्ण क्षमतेने मैदानात उतरल्याचे दिसून आले. टाकेद गटानेही यावेळी
कोकाटे यांना साफ नाकारून वाजे यांना सुमारे साडेचार हजाराचे मताधिक्य बहाल केले. चास गटाने तर वाजे यांना तर तब्बल दहा हजारांहून अधिक मतांचे दान झोळीत टाकले.
कोकाटे यांना पूर्वभागातील देवपूर जिल्हा परिषद गटातून सात हजार ७८४ मताधिक्य मिळाले तर नांदूरशिंगोटे गटात ९८८ मतांची आघाडी राहिली. वाजे यांना सिन्नर शहरासह नायगाव, मुसळगाव, ठाणगाव, चास व टाकेद या जिल्हा परिषद गटात भरघोस मताधिक्य मिळाले. त्यामुळे वाजे यांचा विजय सुकर झाला.
गेल्या निवडणुकीपेक्षा वाजे यांचे सिन्नर शहरातील मताधिक्य कमी झाले. वाजे यांच्या डुबेरे या गणाने तब्बल सात हजार २२३
मतांची भरभक्कम आघाडी देऊन वाजे यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पोस्टल मतदानातही वाजे यांनी बाजी मारली. पोस्टल मतदानाचे वाजे यांना ३१५, तर कोकाटे यांना १८७ मते मिळाली. निवडणुकीत ८९९ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. (वार्ताहर)