सिन्नरला शिवसेनेचा वचननामा प्रसिध्द
By Admin | Updated: November 16, 2016 01:41 IST2016-11-16T01:44:40+5:302016-11-16T01:41:31+5:30
सिन्नरला शिवसेनेचा वचननामा प्रसिध्द

सिन्नरला शिवसेनेचा वचननामा प्रसिध्द
सिन्नर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व वचननाम्याचे प्रकाशन खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, लक्ष्मी ताठे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
येथील आडव्या फाट्यावरील गोदावरी लॉन्सवर झालेल्या कार्यक्रमास मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, शिवाजी देशमुख, तालुकाप्रमुख दीपक खुळे, शहरप्रमुख गौरव घरटे, अॅड. एन. एस. हिरे, रामनाथ धनगर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण डगळे, सागर वारुंगसे, शिवसेनेचे उमेदवार यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वचननामा प्रसिध्द करण्यात आला. यात शहर विकासाची विविध आश्वासने देण्यात आली आहेत.
नाशिक लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी एकट्या सिन्नर विधानसभा मतदार संघास निम्मा स्थानिक विकास निधी दिला असून इतर शासकीय योजनांमधूनही सिन्नरसाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर केल्याचे गोडसे यावेळी म्हणाले. सिन्नर तालुक्यातील आमदार वाजे यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांचेही गोडसे यांनी यावेळी कौतूक केले. तिकीट वाटपात काही जणांशी आमचे मतभेद झाले असले तरी मनभेद झाले नसल्याचे वाजे यावेळी म्हणाले. आपण फक्त विकासकामांचा प्रचार करणार असून विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आपल्यावर तमासगीर म्हणून टीका करणाऱ्यांनी गेली पाच वर्षे पालिकेत केलेला तमाशा सिन्नरकरांनी पाहिला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. शहरातील स्मशानभुमींची दूरवस्था झाली असून नागरिकांचे मरणही त्यांनी अवघड करुन
ठेवल्याचे वाजे म्हणाले. केवळ सह्णाजीराव असणाऱ्यांपेक्षा विकासकामांबाबत स्वत:ची मते असणाऱ्या उमेदवारांना आपण पालिकेची तिकीटे दिली असल्याचे वाजे म्हणाले.(वार्ताहर)