सिन्नरला २० उमेदवारांची अनामत जप्त

By Admin | Updated: February 27, 2017 01:24 IST2017-02-27T01:24:02+5:302017-02-27T01:24:19+5:30

शैलेश कर्पे : सिन्नर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात रणांगण गाजविण्यासाठी उतरलेल्या ५९ पैकी २० उमेदवारांवर आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त होण्याची नामुष्की ओढावली.

Sinnar confiscates deposits of 20 candidates | सिन्नरला २० उमेदवारांची अनामत जप्त

सिन्नरला २० उमेदवारांची अनामत जप्त

शैलेश कर्पे : सिन्नर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात रणांगण गाजविण्यासाठी उतरलेल्या ५९ पैकी २० उमेदवारांवर आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त होण्याची नामुष्की ओढावली. राष्ट्रवादीच्या ७, मनसेच्या ३, राष्ट्रीय समाज पक्षाच्या ३, कॉँग्रेस व बहुजन समाज पार्टीच्या प्रत्येक १, तर ५ अपक्षांना आपले डिपॉझिट गमवावे लागले. सर्व जागांवर निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना व भाजपाच्या एकाही उमेदवाराचा यात समावेश नाही.  निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या २० उमेदवारांचे १० हजार ५५० रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका २३ फेबु्रवारी रोजी पार पडल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सिन्नर तालुक्यातील सहा जागांसाठी २० उमेदवार रिंगणात होते. त्यात राष्ट्रवादीचे नांदूरशिंगोटे गटाचे उमेदवार बाळासाहेब वाघ वगळता राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मनसे व रासपने गटात प्रत्येकी एका जागेवर उमेदवार उभा केला होता. या दोघाही उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. जिल्हा परिषदेसाठी तालुक्यात एकमेव अपक्ष उमेदवार रिंगणात होते. नांदूरशिंगोटे गटातील अपक्ष उमेदवार अ‍ॅड. विलास पगार यांचेही डिपॉझिट या निवडणुकीत जप्त झाले. देवपूर व ठाणगाव या जिल्हा परिषद गटात शिवसेना व भाजपा उमेदवारांत दुरंगी लढत झाली. त्यामुळे या दोन्ही गटात कोणत्याही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. सिन्नर तालुक्यातील सर्वच्या सर्व सहा गट ओबीसीसाठी राखीव असल्याने उमेदवारासाठी पाचशे रुपये अनामत होती. पाच उमेदवारांची दोन हजार ५०० रुपयांची अनामत या निवडणुकीने शासनाच्या तिजोरीत जमा झाली.  सिन्नर पंचायत समितीच्या १२ जागांच्या निवडणुकीत ४१ उमेदवारांनी आपले नशीब अजमाविले. त्यात १५ उमेदवारांवर आपले डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. ठाणगाव, चास व भरतपूर गणात दुरंगी लढत झाली होती. या गणातील एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. नायगाव गणातील ३, गुळवंच, शिवडे, डुबेरे व पांगरी गणातील प्रत्येकी २ तर माळेगाव, मुसळगाव, गुळवंच, देवपूर, नांदूरशिंगोटे या गणातील प्रत्येकी एका उमेदवाराचे डिपॉझिट शासन तिजोरीत भरले गेले. पंचायत समितीच्या १५ उमेदवारांचे ८ हजार ५० रुपये शासनाकडे जमा झाले. जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या १५ अशा एकूण २० उमेदवारांचे १० हजार ५५० रुपये शासनाच्या महसुलात भर पडली.
जिल्हा परिषद सदस्यावर अनामत जप्तीची वेळ
नायगाव गटातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बर्डे यांनी या निवडणुकीत माळेगाव गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी केली होती. पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने बर्डे यांनी पंचायत समितीच्या निवडणूक आखाड्यात उतरले होते; मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार बर्डे यांना केवळ ८७९ मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली.

Web Title: Sinnar confiscates deposits of 20 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.