सिन्नरला मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
By Admin | Updated: January 9, 2016 22:50 IST2016-01-09T22:39:34+5:302016-01-09T22:50:04+5:30
दहशत : शहरात वृद्ध जखमी, शिंदेवाडीत तीन शेळ्या व वासरू ठार

सिन्नरला मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
सिन्नर : शहर व तालुक्यात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, शुक्रवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरातील एक वृद्ध गंभीर जखमी झाला, तर तालुक्यातील शिंदेवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी एका वासरासह तीन शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या मोकाट कुत्र्यांचा संबंधित विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शुक्रवारी सकाळी येथील जयवंत क्षत्रिय हे सकाळी साडेसहाच्या सुमारास फेरफटका मारून घरी येत ऐश्वर्या गार्डनसमोर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्यात बेसावध क्षत्रिय अतिशय घाबरले. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन त्यांची भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. यात जखमी झालेल्या क्षत्रिय यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
चार-पाच दिवसांपासून सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदेवाडी शिवारातही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, चार दिवसात वेगवेगळ्या ठिकाणच्या हल्ल्यात या कुत्र्यांनी एक वासरूसह तीन शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शाळकरी मुले धास्तावली आहेत.
शिंदेवाडी शिवारात चार ते पाच दिवसांपासून कुत्र्यांचा संचार सुरू आहे. ही कुत्रे शेळ्या व वासरांवर, व नागरिकांवर हल्ला करीत आहेत. शिंदेवाडी येथील भाऊसाहेब पुंजा हांडोरे यांचे वासरू तेसच रवींद्र प्रभाकर हांडोरे, चंद्रकांत हांडोरे, जनार्दन गणपत हांडोरे यांची प्रत्येकी एक शेळी या कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झाली. कुत्र्यांच्या टोळीची परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. यामुळे पशुपालक व शाळेत पायी जाणारे विद्यार्थी धास्तावले आहेत. पाळीव प्राण्याबरोबरच माणसांवर या भटक्या कुत्र्यांनी चाल केल्याची घटना घडल्या आहेत. या घटनेची परिसरातील शेतकऱ्यांनी वावी पोलीस ठाण्यात माहिती दिली. सदर भटके कुत्रे अन्य ठिकाणांहून आणून सोडले असल्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीच्या पशुसंवर्धन खात्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करवा, अशी मागणी होत आहे.
सिन्नर शहरातही भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याने रात्री-अपरात्री उपनगरात पायी जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. शहरवासीयांना रात्रीच्या वेळी एकटे-दुकटे फिरणेही अवघड होऊन बसले आहे. पालिका प्रशासनाने अप्रिय घटना घडण्यापूर्वी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)