सिन्नरला शेतीपूरक व्यवसाय संकटात
By Admin | Updated: May 18, 2016 23:21 IST2016-05-18T23:18:15+5:302016-05-18T23:21:09+5:30
दुष्काळाचा फेरा : सलग पाचव्या वर्षी पावसाचे प्रमाण घटल्याचा परिणाम

सिन्नरला शेतीपूरक व्यवसाय संकटात
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात नको तेव्हा येणारा अवकाळी पाऊस व गेल्या पाच वर्षांपासून सुुरू असलेली दुष्काळाची मालिका यामुळे शेतीधंदा आतबट्ट्याचा झाल्याने शेतीपूरक व्यवसाय संकटात सापडले आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून तालुक्याच्या पूर्वभागातील पांगरी, पंचाळे, देवपूर, वावी, मीठसागरे, शहा, धनगरवाडी, शिंदेवाडी, वडांगळी, खडांगळी, मेंढी, सोमठाणे, उजनी, दहीवाडी, सांगवी, पुतळेवाडी, विघनवाडी, निमगाव सिन्नर, गुळवंच, दक्षिणेकडील मऱ्हळ, निऱ्हाळे, खंबाळे, दोडी, नांदूरशिंगोटे, भोकणी, खोपडी आदि भागात गेल्या पावळ्यात एकही जोरदार पाऊस झाला नाही. खरिपात रिमझिम पावसावर पिके आली असली तरी, शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन लागले नाही. त्यानंतर रब्बीतही समाधानकारक पाऊस नसल्याने हा हंगामही वाया गेला. जिरायती भागात शेती तोट्यात गेल्याने बळी राजा चिंतातुर झाला आहे. उशिराच्या पावसाने हजेरी लावली तरी त्याचा फारसा फरक पडला नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी जोडधंदा म्हणून दूध, कुक्कुटपालन आदि व्यवसाय निवडले आहेत. मात्र त्यासाठीचा मुख्य व्यवसायच अडचणीत आल्यावर पाणी आणि चाराटंचाईने हे दोन्हीही व्यवसाय सध्या डबघाईस आल्याचे शेतकरी सांगत आहेत.
जनावरांसाठी ओला चारा बागायती भागातून घेऊन यावा लागतो. निफाड, कोपरगाव व सिन्नरच्या पूर्वेकडील काही बागायती क्षेत्रातून चारा म्हणून ऊस विकत घ्यावा लागतो आहे. कुक्कुट-पालकांना पक्ष्यांंना पिण्यासाठी टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागते आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी माणसांना टँकर सुरू करण्यात आले आहे. डरडोई रोज वीस लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. माणसांना पाणी मिळते; मात्र जनावरांना पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिल्याने शासनाने शेतकऱ्यांकडील जनावरे वाचवण्यासाठी छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)