सिंहस्थ कामांचा दर मंगळवारी आढावा

By Admin | Updated: July 17, 2014 21:59 IST2014-07-17T01:23:08+5:302014-07-17T21:59:35+5:30

सिंहस्थ कामांचा दर मंगळवारी आढावा

Simhastha work rate reviews on Tuesday | सिंहस्थ कामांचा दर मंगळवारी आढावा

सिंहस्थ कामांचा दर मंगळवारी आढावा

 

नाशिक : बारा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे दृश्य स्वरूपात कोणतेही काम दिसत नसल्याने सर्वत्र व्यक्त होणारी नाराजी लक्षात घेता, प्रशासनाने आता सर्वच विभागांना तगादा लावण्याबरोबरच, त्यांच्या दैनंदिन कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, यापुढे दर मंगळवारी दुपारी सर्वच संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून आज झालेल्या बैठकीत भूमिगत वीजतारा व पिण्याच्या पाण्याची लाइन टाकणाऱ्या वीज कंपनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सप्टेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनीच याकामी लक्ष घालून मेळा अधिकारी महेश पाटील यांना आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पाटील यांनी आज यासंदर्भात बैठक घेतली. कुंभमेळा तोंडावर आलेला असताना, एकही नजरेत भरणारे काम दिसत नसल्याबद्दल साधू-महंतांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. त्यातच सरकारी यंत्रणेची चालही मंदगतीने सुरू असल्यामुळे वर्षभरात कामे पूर्ण होतील किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात असल्यामुळे प्रत्येक विभागाच्या कामांच्या अडीअडचणी पाटील यांनी जाणून घेतल्या. विशेष करून दोन भिन्न खात्यांवर अवलंबून असलेल्या कामांबाबतच दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्याने एकमेकांशी संपर्क व समन्वय साधण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. वीज वितरण कंपनीकडून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भूमिगत वीज वायर टाकण्यात येणार आहे, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून त्र्यंबकेश्वर येथे अंतर्गत पाइपलाइनचे काम करण्यात येणार आहे. या दोघांच्या कामांमुळे अन्य यंत्रणांना कामे करणे अवघड होत असल्याने या दोघांनाही सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली असून, उद्यापासून त्यांच्या दैनंदिन कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीस सर्वच खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. त्यात विशेष करून कामे सुरू करण्यात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मार्चअखेरपर्यंत सारी कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पुढच्या मंगळवारी पुन्हा अशीच बैठक घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Simhastha work rate reviews on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.