सिंहस्थ आटोपला....शासनाच्या निधीची अजूनही प्रतीक्षा
By Admin | Updated: October 13, 2015 23:02 IST2015-10-13T23:01:49+5:302015-10-13T23:02:25+5:30
सिंहस्थ आटोपला....शासनाच्या निधीची अजूनही प्रतीक्षा

सिंहस्थ आटोपला....शासनाच्या निधीची अजूनही प्रतीक्षा
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पार पाडण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे नाशिक मुक्कामी एक वेळा नव्हे, तर तब्बल दोन वेळा पुनरुच्चार करणाऱ्या शासनाने संपूर्ण कुंभमेळा पार पडल्यानंतरही मंजूर आराखड्यानुसार झालेल्या कामांवरील खर्चासाठी शासनाकडून निधीची तरतूद न केल्याने ठेकेदारांची घालमेल वाढली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करावयाच्या विकास कामांसाठी विविध खात्यांच्या एकत्रित २३८७ कोटी खर्चाच्या आरखड्यास शासनानेच मंजुरी दिली होती व त्यानुसार साधारणत: जानेवारी महिन्यापासून कामे हाती घेण्यात आली. या कामांसाठी शासनाने एकत्रित रक्कम जिल्हा प्रशासनाकडे न पाठविता, त्या त्या खात्याने अर्थसंकल्पात पुरवणी मागण्यांच्या आधारे निधी मंजूर तो स्थानिक पातळीवर पाठविला होता, फक्तनगरविकास खात्याच्या अंतर्गत असलेल्या निधीची तरतूद जिल्हा प्रशासनाकडे म्हणजेच सिंहस्थ कुंभमेळा कक्षाकडे पाठविण्यात आली. शासनाने वेळोवेळी त्यासाठी निधी पाठविला असला तरी, साधारणत: मार्च महिन्यानंतर अनेक तातडीची व अत्यावश्यक कामांची वाढ करण्यात आली, या कामांसाठी मूळ आराखड्यात निधीची तरतूद नसल्याने ती कशी करावी असा प्रश्न तर होताच, पण आखाड्याच्या साधू-महंतांनीही ऐनवेळी अनेक मागण्या उचलून धरल्याने अनेक वाढीव कामे करावी लागली.
सिंहस्थाच्या मंजूर बजेट पेक्षाही खर्चाची आकडेवारी वाढल्याने या संदर्भात पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार निधी देईल, असे जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरोहित संघाच्या ध्वजारोहणात व आखाड्यांच्याही ध्वजारोहणात मार्गदर्शन करताना निधीची कमतरता पडणार नाही, असा शब्द शासकीय यंत्रणेला दिला होता. प्रत्यक्षात ध्वजारोहणानंतर शासनाने एक रुपयाही वाढीव निधी मंजूर तर केलाच नाही, परंतु पैसे सुद्धा उपलब्ध करून दिलेले नाहीत. उलट ज्या खात्यांनी मूळ आराखड्यात कामे सुचविली, परंतु त्यात नंतर बदल होऊन खर्चात कपात झाली, त्यांच्याकडून माहिती मागविण्यात आली, त्यात साधारणत: ५० कोटी रुपयांच्या आसपास निधी उपलब्ध झाला. (प्रतिनिधी)