सिंहस्थ : साधू-महंतांसह भाविकांमध्ये नाराजी
By Admin | Updated: July 18, 2015 00:30 IST2015-07-18T00:27:17+5:302015-07-18T00:30:57+5:30
श्रीक्षेत्र करंजी रस्त्याची दुरवस्था

सिंहस्थ : साधू-महंतांसह भाविकांमध्ये नाराजी
दिंडोरी : मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र करंजी येथे जाण्यासाठी सिंहस्थ निधीतून रस्त्याचे काम झाले होते. यंदा मात्र येथे मागणी करूनही कोणतेही काम न झाल्याने भाविकांबरोबरच येथे येणाऱ्या साधू-महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणाजवळ श्री क्षेत्र करंजी येथे कर्दमाश्रम असून, हे दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून ओळखले जाते. पदमासनात असलेली भारतातील एकमेव दत्तात्रेयांची मूर्ती येथे असून, निसर्गसंपन्न परिसरात विविध मंदिरे आहेत. दरवर्षी साधू-महंतांसह हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. पुरातन काळापासून दशनाम जुना आखाड्यातील साधू-महंत कुंभमेळ्याला येथे येऊन वास्तव्य करतात. पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानाला येतात. येथील गंगामाईच्या स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गत कुंभमेळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष विद्या पाटील यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करत येथे सिंहस्थ निधीतून पक्के डांबरीकरणाचे रस्ते मंजूर केले होते. मात्र त्यावेळी रस्त्याचे काम होऊन पुन्हा त्याचे नूतनीकरण झालेले नाही. परिणामी रस्त्याची दुरवस्था झाली असून, किमान या सिंहस्थात तरी नूतनीकरण होईल अशी भाविकांना आशा होती, मात्र ट्रस्टने पाठपुरावा करूनही या कामास निधी मिळाला नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथे साधू-महंत येऊ लागले असून, त्यांनीही रस्त्याचे काम न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)