घाटांवर साचला गाळ
By Admin | Updated: September 21, 2015 23:33 IST2015-09-21T23:32:09+5:302015-09-21T23:33:47+5:30
अस्वच्छता : घाटांची स्वच्छता राखण्याचे आव्हान

घाटांवर साचला गाळ
नाशिक : कुंभमेळ्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने गोदावरी नदीकिनारी कॉँक्रीट घाट बांधले. टाळकुटेश्वर पुलापासून तर थेट टाकळीपर्यंत कॉँक्रीट घाट तयार करण्यात आले आहेत. या घाटांवरील पाणी ओसरल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात गाळ साचला. गोदाकाठालगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुर्गंधी फैलावत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कुंभमेळ्याचे शाहीस्नान आटोपल्यानंतर नदीपात्राची पाण्याची पातळीही कमी झाली आहे. यामुळे गोदाकाठालगत नव्याने बांधण्यात आलेल्या घाटांवरील पाणी ओसरले असून सर्वत्र गाळ साचला आहे. यामुळे कुंभमेळ्याच्या पर्वणीआगोदर चकाकणारे कॉँक्रीट घाट गाळामध्ये हरविले आहे. परिणामी नदीसौंदर्याचे तीनतेरा वाजले आहे. या घाटांची स्वच्छता राखण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आगामी काळामध्ये राहणार आहे. कारण टाळकुटेश्वर पुलापासून तर थेट गोदावरी कपिला संगमापर्यंत अखंड कॉँक्रीट घाट तयार करण्यात आला आहे. या घाटांवर भाविकांना उतरण्यासाठी रस्तेदेखील तयार करण्यात आल्यामुळे भविष्यात येथे भिकाऱ्यांचे वास्तव्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सार्वजनिक शौचालयाचे ठिकाण म्हणूनदेखील घाटांचा वापर होण्याचा धोका असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाने तयार केलेले कॉँक्रीट घाट स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचा यक्षप्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)