सेटलवाड यांच्या समर्थनार्थ मूक निदर्शने
By Admin | Updated: August 7, 2015 23:49 IST2015-08-07T23:00:55+5:302015-08-07T23:49:43+5:30
सेटलवाड यांच्या समर्थनार्थ मूक निदर्शने

सेटलवाड यांच्या समर्थनार्थ मूक निदर्शने
नाशिक : गुजराथ दंगलीतील पीडितांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्यावर सरकारकडून सुरू असलेल्या केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शहरातील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या लोकशाही हक्क संरक्षण समितीच्या वतीने शुक्रवारी मूक निदर्शने करण्यात आली.
गुजराथमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सेटलवाड यांनी मोठे काम उभे केले. त्यामुळेच निष्पापांचे बळी घेणाऱ्या माया कोडनानी आणि बाबू बजरंगींसारख्या १२० लोकांना न्यायालयाने शिक्षा मिळाली. भारतीय न्यायमूल्यांवर विश्वास ठेवून कार्य करणाऱ्या सेटलवाड यांच्या कार्याबद्दल खरे तर केंद्र सरकारने त्यांचा सत्कार करणे गरजेचे असताना केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या केंद्रीय गुप्तचर विभागाला सेटलवाड या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका वाटतात, याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आणि शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सकाळी ११ ते दुपारी १२ अशी एक तास मूक निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारचा निषेध, केंद्र सरकारची कारवाई सूड बुद्धीने अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलक तासभर उभे होते; मात्र जिल्हाधिकाऱ्यांना कोणतेही निवेदन न देता केवळ जागृतीपर पत्रके वाटण्यात आली. या आंदोलनात मिलिंद मुरुगकर, लोकेश शेवडे, अरुण ठाकूर, डॉ. डी. एल. कराड, वसंतराव हुदलीकर, शांताराम चव्हाण, अरविंद चित्तेवाल, संजय अपरांती यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)