भाजपा-राष्ट्रवादीत कडवी झुंज रंगण्याची चिन्हे
By Admin | Updated: November 12, 2016 22:26 IST2016-11-12T22:25:40+5:302016-11-12T22:26:16+5:30
भाजपा-राष्ट्रवादीत कडवी झुंज रंगण्याची चिन्हे

भाजपा-राष्ट्रवादीत कडवी झुंज रंगण्याची चिन्हे
नितीन बोरसे सटाणा
शुक्रवारी अर्ज माघारीनंतर येथील पालिकेच्या सर्वच प्रभागातील तसेच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकंदरीत सर्वच प्रभागांमध्ये अतितटीच्या लढती अपेक्षित आहेत. मुख्यत: भाजपा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा एक अपवाद वगळता पूर्ण पॅनल देण्याचा प्रयत्न केल्यामुळे या दोन तुल्यबळ पक्षांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कडवी झुंज होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पालिकेच्या या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे काही प्रभागातून श्री आणि सौ, पितापुत्र, नातेगोते, भाऊबंध निवडणूक रिंगणात उतरल्याने या लढती सर्वांसाठी लक्षवेधी ठरत आहेत. अशीच प्रभाग १ मधील लढत गेल्या काही वर्षांपासून माजी आमदार संजय चव्हाण आणि त्यांचा परिवार राजकारणात केंद्रस्थानी आहे. स्वत: संजय चव्हाण माजी आमदार असून त्यांच्या सौभाग्यवती दीपिका विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या मातोश्री सुलोचना चव्हाण अडीच वर्षांपासून शहराच्या नगराध्यक्ष आहेत. मात्र सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टी कितीही मिळाल्या तरी समाधान होत नाही हा मनुष्य प्राण्याचा गुणदोष आहे. याचे प्रत्यंतर शहराला दिसून येत आहे.
आजपर्यंत राजकारणापासून अलिप्त असलेल्या संजय चव्हाण यांचे पिताश्री कांतीलाल चव्हाण यांनी वयाची सत्तरी पार करताना समाजसेवेची झूल बाजूला ठेवत राजकारणात उडी घेतली आहे.