पक्षीय उमेदवारांनाही फटका
By Admin | Updated: February 8, 2017 00:42 IST2017-02-08T00:42:31+5:302017-02-08T00:42:46+5:30
छाननीत विविध आक्षेप : शौचालय नाही, गटातील, गणातील सूचक नाही, ठेकेदारी

पक्षीय उमेदवारांनाही फटका
नाशिक : जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची मंगळवारी छाननी होउन काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या पक्षांना धक्का बसला आहे. निवडणुक आयोगाच्या नव्या नियमामुळे अधिकृत पक्षाचा अर्ज बाद झाला असला तरी त्या उमेदवाराचा अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आल्याने या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान विविध गमतीजमतीही घडल्या तर काही ठिकाणी बाचाबाचीच्या प्रकारामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विविध प्रकारच्या हरकती घेउन प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यासाठी वेगवेगळ्या क्ल्युप्त्याही यावेळी लढविण्यात आल्या. मालेगाव तालुक्यातील कळवाडी गणाच्या भाजपा उमेदवार सुनीता रामचंद्र सूर्यवंशी यांच्याकडे शौचालय नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. तर भाजपाच्याच कळवाडी गटाच्या उमेदवार बलबिरकोर गिल यांच्या नामांकन अर्जावर हरकत नोंदविण्यात आली होती; मात्र तब्बल पाच तास या हरकतीवर मॅरेथॉन चर्चा होऊन त्यांचा अर्ज अखेर वैध ठरविण्यात आला. हरकत प्रक्रियेमुळे शिवसेना व भाजपा उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. यामुळे प्रांत कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. येवला तालुक्यातील सायगाव गणातून भाजपच्या मनीषा पुणे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत बी फॉर्म जोडलेला नव्हता त्यामुळे भाजपच्या वतीने भरलेला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरला. सावरगाव गणातून अर्चना वैद्य यांनी राष्ट्रवादीच्या वतीने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर पक्षाचे चिन्ह लिहिलेले नसल्याने त्यांची अपक्ष म्हणून उमेदवारी ग्राह्य धरण्यात आली. नांदगाव तालुक्यातील जातेगाव गटातील काँग्रेसचे उमेदवार सुनीता धीवर व भालुर गटातील भाजप उमेदवार आशाबाई जगताप , भाकपचे फिकरा पवार यांच्यासह एकूण सहा जणांचे उमेदवारी अर्ज हमीपत्रावर सही केली नसल्याच्या मुद्द्यावर अवैध ठरविण्यात आले आहेत. सन २०१२ मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पाच वर्ष निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविल्याचा फटका कळवण तालुक्यातील मानूर जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या उमेदवार रंजना पवार व कनाशी गटातील उमेदवार बाबुलाल कोल्हे यांना बसला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोन्ही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले आहे . बापखेडा गणातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी देखील मुदतीत निवडणूक खर्च न दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला असून बापखेडा गणातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वैभव पवार यांनी उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून गणातील मतदाराची स्वाक्षरी न घेता गटातील उमेदवारीची स्वाक्षरी असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. सिन्नर तालुक्यातील भरतपूर गणातून मिरगाव येथील स्नेहल शेळके यांचे वय २१ वर्षे पूर्ण नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार विनायक माळेकर हे जिल्हा परिषदेचे अधिकृत ठेकेदार असल्याची हरकत कॉँग्रेसच्या देवीदास जाधव यांनी घेतल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. सटाणा तालुक्यातील पाठवेदिगर गणातील भाजपच्या उमेदवार कल्पना सोनवणे यांनी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र न जोडल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.