सिडकोत घंटागाडीखाली बालिका ठार
By Admin | Updated: September 11, 2015 00:48 IST2015-09-11T00:48:22+5:302015-09-11T00:48:43+5:30
नुकसानभरपाई द्यावी : ठेकेदारावर कारवाईची मागणी

सिडकोत घंटागाडीखाली बालिका ठार
सिडको : येथील तानाजी चौक परिसरात राहणाऱ्या दहा वर्षीय मुलीच्या डोक्यावरून घंटागाडीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १०) सकाळी घडली. या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्ष, नागरिकांनी मनपाच्या कारभारावर तीव्र टीका करीत मयत मुलीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
सिडकोतील प्रभाग ४३ मधील तानाजी चौकात जिजाबराव ठाकरे हे कुटुंबासमवेत राहतात. गुरुवारी (दि. १०) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कचरा संकलनासाठी घंटागाडी आली. दरम्यान, येथे राहणारी १० वर्षीय मुलगी नेहा ठाकरे ही शाळेत जात असताना घंटागाडीने तिला धडक दिली. या धडकेत नेहाच्या डोक्यावरून घंटागाडीचे चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
घंटागाडी (एमएच १५, एबी ४१९७) चालक शंकर आवारे यास अंबड पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने घंटागाडीचा ठेका चेतन बोरा यांना दिला असून, ते कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मयत नेहा ही उत्तमनगर येथील जनता विद्यालयात इयत्ता तिसरीमध्ये शिकत होती. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)