जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट
By Admin | Updated: February 14, 2017 01:30 IST2017-02-14T01:30:18+5:302017-02-14T01:30:34+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट
नाशिक : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्याचा महसूल खात्याच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम जाणवू लागला असून, अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याच्या कारणामुळे शासकीय कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांचीही संख्या रोडावली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करून आचारसंहितेची अंमलबजावणी केल्याने त्याचा तसाही परिणाम शासकीय कामकाजावर झाला होता. तथापि, पदवीधर निवडणुकीची तयारी करण्याचे काम प्रांत व तहसीलदारांवर सोपविण्यात आल्याने ते त्यात गुंतून पडले होते. या निवडणुकीसाठी राज्य आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदारांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणुकीचे काम प्राधान्याने व मोठे असल्याने संपूर्ण प्रांत व तहसील कार्यालयातील अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कामात जुंपण्यात आले आहे. खुद्द जिल्हाधिकारी त्यावरील नियंत्रण अधिकारी असल्याने तेदेखील जातीने लक्ष घालीत आहेत. सर्वत्र निवडणूकमय वातावरण असल्यामुळे व कोतवाल, तलाठ्यापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतची सारी यंत्रणा त्यात गुंतल्यामुळे महसूल खात्याचे कामकाज जवळ जवळ ठप्प झाले आहे.