बाजारपेठेत शुकशुकाट
By Admin | Updated: October 24, 2016 23:19 IST2016-10-24T23:18:38+5:302016-10-24T23:19:12+5:30
देवळा : नागरिकांचा खरेदीमध्ये अनुउत्साह

बाजारपेठेत शुकशुकाट
देवळा : दिवाळीच्या सुट्या लागल्यानंतर शहरातील बाजारपेठ गजबजून व्यवसायांवरील मंदीचे सावट दूर होऊन सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होते, असा दरवर्षीचा व्यापारीवर्गाचा अनुभव असल्याने सर्व व्यावसायिक दिवाळीच्या सुट्या लागण्याची प्रतीक्षा करीत होते. परंतु सुट्या लागूनही शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट असल्याने व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी चांगला समाधानकारक पाऊस झाल्याने सर्व धरणे, पाझरतलाव भरले व नद्या-नाल्यांना पाणी आले. पिकेही जोमदार आहेत. यामुळे गत चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा सामना करून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह व्यापारीवर्ग व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढून व्यवसायात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यापारीवर्ग व्यक्त करत होता. मात्र यावर्षी बाजारपेठ अद्याप शांत असून, ऐन दिवाळी सणात बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. देवळा येथील बाजारपेठ पूर्णपणे कांदा मार्केटवर अवलंबून आहे. (वार्ताहर)
व्यावसायिकांचे नुकसान
पूर्वी देवळा कांदा मार्केट सर्वदूर प्रसिद्ध होते. साक्र ी, पिंपळनेरपासून शेतकरी कांदा विक्र ीसाठी येथे आणत. त्यामुळे देवळ्याची बाजारपेठ सतत गजबजलेली असे व व्यापार-उदिम जोरात असल्याने व्यापारी सातत्याने प्रगतीकडे वाटचाल करत होते. कालांतराने यात बदल होत गेले. उमराणा, कळवण, वणी, चांदवड, सटाणा, नामपूर येथे नवीन कांदा मार्केट सुरू झाले व याचा सर्वाधिक फटका देवळा शहरातील व्यावसायिकांना बसला आहे. शेतकरी कांदा विक्र ीसाठी इतरत्र जाऊ लागल्याने देवळा बाजार समितीमधील कांद्याची आवक कमी होऊ लागली. त्यातच शहरातील कांदा व्यापाऱ्यांनी आजूबाजूला घडत असलेल्या या घडामोडींची दखल घेत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य ते बदल न करता आपली पारंपरिक पद्धतच सुरू ठेवली. त्याचाही व्यावसायिकांना फटका बसला. कांदा व्यापाऱ्यांनी नंतर काही बदल केले; पण तोपर्यंत उशीर झाला होता. सद्या कांद्यासह इतर शेतमालाचे बाजारभाव खूपच कमी झालेले आहेत. शेतकऱ्यांनी चाळीत साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी विपन्नावस्थेत सापडला असून, त्याची क्र यशक्ती कमी झाल्यामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घरातील एखादा सदस्य हा शहरात नोकरी किंवा व्यवसाय करतो त्या शेतकऱ्याचे कुटुंबीय शहरात राहणारा सदस्य दिवाळीसाठी गावाकडे परत आल्यानंतर आपली आर्थिक समस्या दूर करून दिवाळी आनंदाने साजरी करू, या अपेक्षेने शहरात राहणाऱ्या सदस्याची गावाकडे येण्याची प्रतीक्षा करीत असतो. शहरातील रेडिमेड कापड दुकान, किराणा, सुवर्णकार आदि दुकानदारांना अवलंबून रहावे लागत असले तरी येत्या दोन-तीन दिवसांत ही मंदी दूर होईल, अशी आशा शहरातील व्यापारी करीत आहेत.