श्रीराम, गरुड रथोत्सव

By Admin | Updated: April 18, 2016 00:36 IST2016-04-18T00:19:04+5:302016-04-18T00:36:57+5:30

रामनवमी : विविध ढोल पथक आणि रांगोळ्यांनी सजला रथमार्ग

Shriram, Garud Rathotsav | श्रीराम, गरुड रथोत्सव

श्रीराम, गरुड रथोत्सव

नाशिक : सियावर रामचंद्र की जय, जय सीता जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय अशा जयघोषाने पंचवटीतील प्राचीन काळाराम मंदिर परिसरातून रविवारी (दि. १७) कामदा एकादशीनिमित्त रामरथ आणि गरूडरथाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. रविवारी संध्याकाळी रामाच्या पादुका आणि भोगमूर्तींचे विधिवत पूजन करून श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजातून मिरवणूक सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली.
यावर्षीचे रथ उत्सवाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गरूड रथात रामाच्या पादुका आणि रामरथात भोगमूर्ती ठेवून विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. गरूडरथाचे अध्यक्ष बाळासाहेब पुजारी आणि रवि दीक्षित तसेच गरूड आणि रामरथाचे मानकरी असलेल्या अहिल्याराम व्यायामशाळा, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ आणि पाथरवट समाजाच्या पदाधिकाऱ्यांना मानाचे गंध लावून सत्कार करण्यात आल्यानंतर दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या. नाशिकचा ग्राम उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवात शेकडो रामभक्त सहभागी झाले होते. सियावर रामचंद्र की जय...
कामदा एकादशीदिनी श्री काळाराम मंदिरापासून श्रीराम आणि गरुड रथाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री गोदातटी रथदर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.

Web Title: Shriram, Garud Rathotsav