गोदाघाटावर विधीसाठी झुंबड

By Admin | Updated: October 13, 2015 00:08 IST2015-10-13T00:07:21+5:302015-10-13T00:08:05+5:30

पितृपक्षाचा समारोप : सर्वपित्री अमावास्येनिमित्त भाविकांची गर्दी

The shrine for rituals on Godaghat | गोदाघाटावर विधीसाठी झुंबड

गोदाघाटावर विधीसाठी झुंबड

 नाशिक : सर्वपित्री अमावास्येनिमित्त श्राद्धविधीसाठी गोदाघाटावर आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. विशेष: उत्तर भारतीय भाविकांमुळे गोदाघाट गजबजून गेला होता. सर्वपित्रीनिमित्त आज घरोघरीही पितरांचे श्राद्ध घालून त्यांचे स्मरण करण्यात आले. पितृपंधरवड्याचा आज समारोप झाल्याने शहरवासीयांना आता सणांचे वेध लागले आहेत.
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते अमावास्या या कालावधीत पितरांच्या स्मरणार्थ पितृपक्ष पाळला जातो. ज्या तिथीला घरातील व्यक्ती दिवंगत झालेल्या असतात, पितृपक्षातील त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध घातले जाते. तर्पणविधी, भाताचे पिंडदान केले जाते. यंदा गेल्या २८ सप्टेंबरपासून पितृ पंधरवड्याला प्रारंभ झाला होता, त्याचा समारोप आज सोमवारी झाला. मृत्यूची तिथी माहीत नसल्यास किंवा त्या तिथीला श्राद्ध करता येऊ शकले नसल्यास सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करावे, असा धर्मशास्त्रीय संकेत आहे. त्यानुसार आज घरोघरी श्राद्धविधी करण्यात आले. बरेच भाविक तीर्थक्षेत्री श्राद्धविधी करण्याला प्राधान्य देतात. त्यानुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थानसह देशभरातील भाविकांनी श्राद्धविधी व स्नानासाठी आज गोदाघाटावर प्रचंड गर्दी केली होती. भाविकांनी गोदावरी पूजन, तर्पण, श्राद्ध, पिंडदान, कावघास आदि विधी पुरोहितांकडून करवून घेतले. सर्वपित्री व सोमवती अमावास्या असल्याने सायंकाळपर्यंत गर्दी कायम होती. (प्रतिनिधी)

Web Title: The shrine for rituals on Godaghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.