शिक्षकाची शिवीगाळ
By Admin | Updated: August 18, 2016 02:00 IST2016-08-18T01:59:15+5:302016-08-18T02:00:37+5:30
न्यायडोंगरी : मद्यप्राशन केल्याचा आरोप

शिक्षकाची शिवीगाळ
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक संदीप पाटील यांनी इयत्ता सातवीच्या वर्गातच मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांशी अरेरावी केल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शालेय समिती अध्यक्ष प्रकाश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पालकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध शाळेचे मुख्याध्यापकांकडे लेखी तक्र ार केली आहे.
सावरगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, शिक्षक संदीप जगतसिंग पाटील यांची सातवीचे वर्गशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १२) दुपारच्या सुटीदरम्यान सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर गेले असता वर्गशिक्षक पाटील यांनी वर्गखोलीतील खुर्चीवर बसून
दारू पिण्याचा सपाटा लावला. सुटीची वेळ संपल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात आले असता त्यांना पाटीलसर दारू पित असल्याचे दिसून आले. मद्यधुंद झालेल्या शिक्षकांने विद्यार्थ्यांना पाहून त्यांना शिवीगाळ करीत वर्गाबाहेर काढले.
विद्यार्थी भयभीत होऊन शाळा सुटण्याची वाट पाहत गुपचूप बसले होते. शाळा सुटताच विद्यार्थ्यांनी घरी जाऊन पालकांना घडलेला
प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत कर्मचारी व शिक्षकवर्ग शाळा बंद करून निघुन गेले होते. शेवटी पालकांना त्या दिवशी निराश होऊन घरी परतावे लागले.
परंतु बुधवारी सकाळी ८ वाजता पालक व संतप्त नागरिकांचा मोठा समुदाय शाळेच्या आवारात
जमा झाला होता. मात्र पाटीलसर शाळेकडे फिरकलेच नाहीत. शेवटी उपस्थित व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह पालकांनी पाटील विरुद्ध लेखी तक्रार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधला. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन घटनेची पाहणी करीत नाहीत तोपर्यंत सदरची वर्गखोली उघडण्यात येणार नाही, असा पवित्रा घेत संबंधित शिक्षकावर कारवाई करून त्यांची त्वरित च बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)