येवला येथे नगरपालिकेचे श्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:11 IST2020-08-21T23:48:38+5:302020-08-22T01:11:37+5:30
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी अभिनव आंदोलन करत पालिकेचे श्राद्ध घालण्यात आले.

येवला येथे नगरपालिकेचे श्राद्ध
येवला : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी अभिनव आंदोलन करत पालिकेचे श्राद्ध घालण्यात आले.
शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी पालिकेचे श्राद्ध घालण्याचा इशारा अमोल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे पालिकेला दिला होता. पालिकेकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने, शुक्रवारी खांबेकर खुंटावर अमोल गायकवाड यांनी पूजा करत श्राद्ध घातले. त्यापूर्वी गायकवाड यांच्यासह विशाल नागपुरे यांनीही मुंडन केले. याप्रसंगी रवि पवार, संतोष गायकवाड, हेमंत हलवाई, मनोज भागवत आदींसह नागरिक उपस्थित होते.
शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून, पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडून पाण्याचे डबके साचले आहे. येणाºया-जाणाºया वाहनांमुळे पादचाºयांच्या अंगावर पाणी उडत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहे. रस्तांची दुरुस्ती होताना कामांचा दर्जा राखला गेला नसल्याने ते लगेच खराब झाल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. पालिकेने नुसती कचखडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली होती.