गैरहजर ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा
By Admin | Updated: November 11, 2015 23:38 IST2015-11-11T23:37:18+5:302015-11-11T23:38:28+5:30
लोकसंख्या रजिस्टर : प्रशिक्षणाला दांडी

गैरहजर ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा
नाशिक : राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) अद्ययावत करण्यासाठी बोलाविलेल्या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या प्रगणक ग्रामसेवकांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, लेखी खुलासा मागविला आहे. खुलासा न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाची अद्ययावत माहिती राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरमध्ये नोंदविण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला असून, त्याचे कामही राष्ट्रीय पातळीवर सुरू झाले आहे. आधारकार्डच्या धर्तीवर राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे (एनपीआर) स्वतंत्र ओळखपत्र शासनाकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाची माहिती गोळा करण्याचे काम प्रगणकांवर म्हणजेच शासकीय नोकरदारांवर सोपविण्यात आले आहे. सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेच्या धर्तीवर हे सर्वेक्षण केले जाणार असल्याने त्यावेळी ज्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले, त्यासारखेच गट पाडण्यात आलेले आहेत. शिक्षकांनी सदरचे काम करण्यास नकार दिल्यामुळे आता अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, लिपिक, तलाठ्यांमार्फत हे काम करून घेण्याचे शासनाचे आदेश असल्याने त्यासाठी २ नोव्हेंबर रोजी नाशिक तहसीलदारांनी प्रगणकांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित केली होती; परंतु त्याकडे सुमारे ५७ ग्रामसेवकांनी पाठ फिरविली. प्रशिक्षणस्थळी घेण्यात आलेल्या हजेरीत हा प्रकार उघडकीस आल्यावर या सर्वांना नोटिसा पाठवून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्या आटोपल्यावर व नोव्हेंबर अखेरपर्यंत सदरचे काम पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत.