आॅनलाइन शॉपिंग पालिकेच्या रडारवर
By Admin | Updated: February 27, 2015 00:07 IST2015-02-27T00:07:17+5:302015-02-27T00:07:33+5:30
एलबीटी चुकवेगिरी : मनपाने बजावली अॅमेझॉनला नोटीस, अन्य डिलर्सची शोधमोहीम

आॅनलाइन शॉपिंग पालिकेच्या रडारवर
नाशिक : ज्यांनी रितसर नोंदणी केली त्यांच्याकडून एलबीटीची वसुली होते, परंतु आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शहरात रोज लाखोंची उलाढाल होत असताना महापालिका मात्र त्याबाबत आजवर अनभिज्ञ होती. राज्यातील औरंगाबाद महापालिकेने आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून होणारी करचुकवेगिरी उघडकीस आणल्यानंतर नाशिक महापालिका सतर्क झाली आणि आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून उलाढाल करणाऱ्या कंपन्या, डिलर्स पालिकेच्या रडारवर आले. त्यानुसार महापालिकेने अॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हीसेस प्रा. लिमिटेड या कंपनीला नोटीस बजावली असून, अन्य डिलर्स-कंपन्यांच्या कार्यालयांची शोधमोहीम सुरू केली आहे.
इंटरनेटच्या मायाजालामुळे आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून घरबसल्या घरपोहोच पाहिजे ती वस्तू प्राप्त होत असते. त्यामुळे ग्राहकांकडून आॅनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. संबंधित कंपन्यांकडे आॅनलाइन मालाची नोंदणी केली की त्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीत मालाचे पार्सल कंपनीच्या डिलर्समार्फत अथवा खासगी कुरिअरमार्फत घरपोहोच मिळते.
आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शहरात रोज लाखोंची उलाढाल होत असली तरी त्याची कुठेही नोंद महापालिकेच्या दफ्तरी नाही. शहरात बाहेरून येणाऱ्या मालावर एलबीटी आकारणी केली जाते. महापालिकेकडे त्यासंबंधी विवरणपत्र दाखल करणाऱ्या व्यावसायिकांकडून एलबीटीची वसुली केली जाते, परंतु आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून शहरात बाहेरून येणाऱ्या मालांवर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधीचा महसूल बुडतो आहे.
अगोदरच आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या महापालिका पै-पै जमा करण्यासाठी झगडत असताना महापालिकेला आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून होणाऱ्या उलाढालीतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळण्याची शक्यता आहे. चार-पाच दिवसांपूर्वीच औरंगाबाद महापालिकेने एका व्यावसायिकाकडून आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून होणारी करचुकवेगिरी उघडकीस आणल्यानंतर नाशिक महापालिकाही सतर्क झाली आणि महापालिकेने शहरात आॅनलाइन शॉपिंगची उलाढाल करणाऱ्या कंपन्या आणि डिलर्सची शोधमोहीम सुरू केली. त्यासाठी महापालिकेने इंटरनेटही पालथे घातले.
त्यानुसार महापालिकेने शहरात उलाढाल करणाऱ्या अॅमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हीसेस प्रा. लिमिटेड या डिलर्सचा शोध घेऊन त्याला आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)