खरेदीला गती
By Admin | Updated: November 1, 2015 22:55 IST2015-11-01T22:45:14+5:302015-11-01T22:55:46+5:30
दिवाळीची तयारी : रविवारमुळे मेनरोड परिसर फुलला

खरेदीला गती
नाशिक : दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी नागरिक सज्ज होत असून, शहरातील बाजारपेठेतही आज रविवार असल्याने खरेदीला चांगलीच गती आली होती. विशेषत: किराणा, कापड दुकानांत वर्दळ वाढली होती. शहराची प्रमुख बाजारपेठ असलेला मेनरोड परिसर ग्राहकांनी फुलून गेला होता; मात्र नोकरदारवर्गाचे पगार, बोनस झालेले नसल्याने तसेच महागाई, दुष्काळाच्या सावटाचा परिणाम जाणवत असल्याने अद्याप ग्राहकांत तेवढा उत्साह नसल्याचे चित्र आहे.
येत्या ११ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन असून, ७ नोव्हेंबर रोजी वसूबारस आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे. वसूबारसपूर्वीचा रविवार असल्याने पणत्या, दिवे, आकाशकंदील या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मेनरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, शालिमार या भागातही ग्राहकांची वर्दळ होती. किराणा, कापड, इलेक्ट्रॉनिक्स व अन्य दुकानांत खरेदी सुरू होती. तथापि, ग्राहकांचा अद्याप दरवर्षीइतका उत्साह दिसून आला नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी ग्राहक दिवाळीच्या साधारण आठवडाभर आधी किराणा मालाची खरेदी करतात; मात्र यंदा महागलेल्या डाळींमुळे ग्राहकांनी हात काहीसा आखडता घेतल्याचे चित्र आहे. महागाईबरोबरच यंदा दिवाळीवर दुष्काळाचेही सावट आहे. तरीही बेसन, तेल, तूप, रवा, मैदा, पोहे आदिंची कमी प्रमाणात का होईना, खरेदी सुरू आहे.