खरेदीच्या वादातून दुकानदारावर हल्ला
By Admin | Updated: July 16, 2016 01:04 IST2016-07-16T00:55:03+5:302016-07-16T01:04:02+5:30
भीतिदायक : एमजी रोडवरील घटना, व्यापारी वर्ग भयभीत

खरेदीच्या वादातून दुकानदारावर हल्ला
नाशिक : कापड दुकानात खरेदीसाठी आलेल्या दोन युवकांसोबत किमतीवरून झालेल्या वादातून दुकानमालकावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़ १६) सायंकाळच्या सुमारास महात्मा गांधी रोडवरील सारडा संकुलमध्ये घडली़ या घटनेनंतर दोन्ही युवक पसार झाले असून दुकानमालक अश्विन पटेल (रा. उमादर्शन सोसायटी, मेरी, दिंडोरी रोड, नाशिक) यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सारडा संकुलमध्ये पटेल यांचे फ्रेंड कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे़ सायंकाळच्या सुमारास दोन युवकांनी दुकानातून कपडे खरेदी केले़; मात्र किमतीवरून त्यांचा व दुकानमालक पटेल यांच्यात वाद झाला़ यातून एकाने हातातील चाकू पटेल यांच्या पोटात मारला व पलायन केले़ यानंतर दुकानमालक पटेल यांनी आरडाओरड केल्याने शेजारील व्यावसायिक जमा झाले व त्यांनी उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले़ या झटापटीत या दोघा युवकांची एक बॅग, चपला व कपडे हे दुकानात राहिले़
या घटनेत गंभीर जखमी झालेले पटेल यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती़
दरम्यान, महात्मा गांधी रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात भरदिवसा दुकानमालकावर झालेल्या हल्ल्यामुळे व्यापारी भयभीत झाले आहेत़ तसेच अशा परिस्थितीत व्यवसाय करणे जिकिरीचे झाल्याचे मतही काही व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे़ (प्रतिनिधी)