घोटी : घोटी-काळुस्ते मार्गावर शेणवड बंधाऱ्याचा आऊटलेट पाणीसाठा असलेल्या विहिरीत कांचनगाव शिवारातील ठाकूरवाडी येथील गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन मुलींचे मृतदेह सोमवारी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह हे कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याने घटना तीन-चार दिवसांपूर्वी घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सदर घटनेचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.
कांचनगाव शिवारातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पारधी (वय १९) आणि सरिता काळू भगत (वय १८) या दोघी दि. ३० जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मुली चार दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यातील मनीषा पारधी हिच्या पालकांनी दि. १ फेब्रुवारी रोजी घोटी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घोटी-काळुस्ते मार्गावर शेणवड बंधाऱ्याचा आउटलेट पाणीसाठा असलेल्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत या दोन्ही मुलींचे मृतदेह तरंगताना आढळले. याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.