सिद्धक्षेत्र गजपंथ येथे शोभायात्रा
By Admin | Updated: April 20, 2016 00:10 IST2016-04-19T23:50:46+5:302016-04-20T00:10:14+5:30
जन्मकल्याणक महोत्सव : सकल जैन समाजाच्या वतीने सोहळा

सिद्धक्षेत्र गजपंथ येथे शोभायात्रा
नाशिक : म्हसरूळ येथील श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र गजपंथ येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशांच्या निनादात आणि प्रचंड जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. शिवाय दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले
होते.
जैन धर्मियांचे तिसऱ्या क्रमांकाचे सिद्धक्षेत्र असलेल्या गजपंथ येथे सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. पंचरंगी जैन ध्वजपताकांनी मंतरलेल्या वातावरणात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ढोल पथक आणि भजनी मंडळाच्या सहभागातून तपस्वी साधूगण रविनंदीजी आणि विप्रणसागर महाराज ससंघ यांच्या सान्निध्यात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी भगवान महावीरांची प्रतिमा असलेली पालखी होती. सजविलेल्या बग्गीतून इंद्र आणि इंद्राणी मनोज व राखी पाटणी, त्यांचे माता-पिता राजेंद्र व त्रिशलादेवी पाटणी यांच्यासह शोभायात्रेत मोठ्या संख्येने जैन समाज सहभागी झाला होता. महिलांनी केशरी साडी तर पुरुषांनी शुभ्र कुर्ता-पायजमा व फेटा परिधान केला होता. वाजत-गाजत निघालेल्या या शोभायात्रेत भगवान महावीरांचा जयघोष करण्यात आला. दरम्यान, उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. शोभायात्रेची सांगता म्हसरूळ येथील दिगंबर जैन मंदिर याठिकाणी झाली. यावेळी १०८ कलशांतून भगवान महावीरांच्या मूर्तीवर जलाभिषेक व पंचामृत मस्तकाभिषेक करण्यात आला. प्रसादी भंडाऱ्याचे आयोजन अनुप जैन यांनी केले होते. त्यानंतर मुनिश्रींचे प्रवचन झाले. दुपारच्या सत्रात मान्यवरांना सन्मानित करण्यात आले, तर सायंकाळच्या सत्रात भगवंतांच्या पाळण्याचा कार्यक्रम भावभक्तिपर वातावरणात पार पडला. त्यानंतर जन्मकल्याणक आधारित नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)