भाजपाच्या नाराजांना शिवसेनेचे पाठबळ

By Admin | Updated: January 20, 2017 01:04 IST2017-01-20T01:04:20+5:302017-01-20T01:04:34+5:30

गळ टाकणे सुरू : बंडखोरांच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची हजेरी

Shivsena's support to BJP's angry | भाजपाच्या नाराजांना शिवसेनेचे पाठबळ

भाजपाच्या नाराजांना शिवसेनेचे पाठबळ

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावानांना डावलून दलबदलंूना संधी दिली जात असल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन भाजपाच्या स्थानिक नेतृत्वालाच आव्हान देण्याचे प्रकार सुरू आहेत. बुधवारी रात्री अशाच एका नाराजाच्या बैठकीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने आता नाराजांना शिवसेनेकडून पाठबळ दिले जात असल्याचे उघड आहे. ज्या प्रभागात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाही, अशा जागांवर भाजपातील नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्यातील सत्तेमुळे नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता येणारच अशा आविर्भावात सध्या पक्षाचे कामकाज सुरू असून, पक्षातील काही नेत्यांच्या वारसांना प्रस्थापित करण्यासाठी विरोधकांना आपलेसे करण्यासाठी पक्षप्रवेश दिला जात आहे. त्यामुळे भाजपात नव्या-जुन्यांचा वाद उफाळून आला आहे. भाजपात अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या लाटेत सहभागी होण्यासाठी आलेल्या अन्य पक्षांतील दलबदलूंमुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. त्यामुळे भाजपाच्या अशा नाराजांची नाशिकरोड पाठोपाठ बुधवारी पंचवटी येथे बैठक झाली. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या प्रभागातच बैठक घेऊन या नाराजांनी त्यांना आव्हान दिले आहे.
या प्रभागातील ११ इच्छुक उमेदवार या बैठकीस उपस्थित होते. याचवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, अ‍ॅड. शिवाजी सहाणे आणि विनायक खैरे यांनी या बैठकीला हजेरी लावली. तसेच शिवसेनेसाठी गळ घातली. ११ इच्छुकांपैकी किमान दोघांना भाजपाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी होती.
हीच मागणी शिवसेनेकडे रेटण्यात आली असल्याचे वृत्त आहे. या प्रभागात शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाही, तसेच अनेक प्रभागात अशीच स्थिती असून, मनसे किंवा अन्य पक्षांतून आयात केलेले उमेदवारही प्रभावी ठरणार नसल्याने मूळ भाजपेयींना पक्षात घेऊन भाजपालाच अडचणीत आणण्याची खेळी शिवसेनेकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's support to BJP's angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.