भाजपा वगळून सत्तेसाठी शिवसेनेची व्यूहरचना

By Admin | Updated: February 26, 2017 00:43 IST2017-02-26T00:43:46+5:302017-02-26T00:43:58+5:30

भाजपा वगळून सत्तेसाठी शिवसेनेची व्यूहरचना

Shivsena's strategy for power except BJP | भाजपा वगळून सत्तेसाठी शिवसेनेची व्यूहरचना

भाजपा वगळून सत्तेसाठी शिवसेनेची व्यूहरचना

नाशिक : सर्वाधिक संख्येत निवडून आलेल्या शिवसेनेला जिल्हा परिषदेवर दुसऱ्यांदा भगवा फडकवण्यासाठी १२ सदस्यांचे बळ कमी पडत असून, त्यादृष्टीने सेनानेतृत्वाने जुळवाजुळव सुरू केली  आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जनतेचा कौल शिवसेनेलाच असून, शिवसेनेचा अध्यक्ष होणार हे नक्की आहे. मात्र यासंदर्भात कोणाशी युती करायची किंवा आघाडी करायची याचा निर्णय मुंबईमधून होईल. एकदा निर्णय झाला की, मग सत्तेची गणिते जुळविण्यास अडचणी येणार नाहीत.  जिल्हा परिषदेत जनतेने शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून दिले असून, जनतेचा कौल मान्य करून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न राहणार असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत महापौर पदावरून शिवसेना व भाजपाची युती फिस्कटलीच तर राज्यात अन्य ठिकाणी जिल्हा परिषद व महापालिकेबाबत काय निर्णय घ्यायचा, याबाबत सेनानेतृत्व काय निर्णय घेते, यावर बरेच काही अवलंबून आहे. मुंबई महापालिकेसाठी महापौर पदासाठी शिवसेनेला कॉँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिलाच तर राज्यातील अन्य राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेचे सर्वाधिक २५ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले असून, बहुमताच्या ३७ या जादुई आकड्यासाठी त्यांना १२ सदस्यांची गरज आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत कॉँग्रेसचे आठ सदस्य निवडून आले असून, त्यांना सोबत घेत अन्य चार अपक्षांनाही बरोबर घेऊन शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रयत्न राहील, असे चित्र आहे. (प्रतिनिधी)
नाशिक : जिल्हा परिषदेत निवडून आलेले चार अपक्ष सदस्य येत्या सोमवारी (दि.२७) विभागीय आयुक्तांकडे अपक्षांच्या गटाची नोंदणी करण्याची शक्यता आहे. शनिवारी (दि.२५) येथील नाशिक तालुका खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयात यासंदर्भात निवडून आलेल्या दोन्ही-तिन्ही अपक्षांनी चर्चा केल्याचे कळते. जिल्हा परिषदेत शिव सेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून आले असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १८, भाजपाचे १५, तसेच कॉँग्रेसचे ०८ सदस्य निवडून आले आहेत.
माकपाचे तीन सदस्य निवडून आले असून, चार अपक्ष सदस्यांची जिल्हा परिषदेत एंट्री झाली आहे. शिवसेना-भाजपा युती झाली तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईच्या महापौर पदावरून शिवसेना व भाजपाची राज्यभरातील युती तुटली तर जिल्हा परिषदेतीलही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला बहुमताच्या ३७ संख्येसाठी एकतर राष्ट्रवादी कॉँग्रेस किंवा कॉँग्रेसह अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे, तर दुसरीकडे भाजपालाही सत्तेत सामील होण्यासाठी शिवसेनेने नकार दिला तर राष्ट्रवादीसोबत युती करावी लागणार आहे. या सर्व घडामोडीत मग अपक्षांची जोड-तोड करण्याचे काम शिवसेना व भाजपालाही करावी लागणार आहे. तिकडे अपक्षांनीही हा जोड-तोडचा धोका लक्षात घेऊन चारही अपक्षांची नोंदणी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने शनिवारी तालुका खरेदी- विक्री संघात संचालक संजय तुंगार यांनी पुढाकार घेत अपक्ष म्हणून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे, रूपांजली विनायक माळेकर व यतिन कदम यांच्यासोबत प्रत्यक्ष व दूरध्वनीवर चर्चा केली. बागलाणमधील अपक्ष सदस्य गणेश अहिरे यांच्या निकटवर्तीयांसोबत दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेनुसार येत्या सोमवारी किंवा मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांकडे अपक्ष आघाडीची नोेंदणी करण्याचे या अपक्षांच्या आघाडीचे प्रयत्न राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena's strategy for power except BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.