शिवसेनेची ग्रामीण भागात मुसंडी
By Admin | Updated: March 1, 2017 01:08 IST2017-03-01T01:07:54+5:302017-03-01T01:08:17+5:30
नाशिक : जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या एकूण १४६ जागांपैकी तब्बल ६० जागा जिंकून शिवसेनेने ग्रामीण भागात मुसंडी मारली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेची ग्रामीण भागात मुसंडी
नाशिक : जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या एकूण १४६ जागांपैकी तब्बल ६० जागा जिंकून शिवसेनेने ग्रामीण भागात मुसंडी मारली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक जागा मिळविण्याबरोबरच पाच पंचायत समित्यांवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, कॉँग्रेस राष्ट्रवादीला धक्का दिला आहे, मात्र जिल्ह्यातील स्टार प्रचारक असलेले ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यासह तीन ठिकाणी शिवसेनेला सत्तेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. शिवसेना (६) आणि भाजपाला (६) समसमान जागा मिळाल्याने या पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी दादा भुसे कोणती भूमिका घेतात याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे. पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पंचायत समिती आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसला ३० जागा मिळाल्या असून, भारतीय जनता पक्षाला २८ जागांवर विजय मिळाला आहे. बहुसंख्य ठिकाणी प्राबल्य असलेल्या कॉँग्रेस पक्षाची या निवडणुकीत पुरती वाताहात झाली असून, केवळ ११ जागांवर कॉँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला सुरगाण्यातील गड राखला आहे. सहा जागा असलेल्या सुरगाणा पंचायत समितीमध्ये माकपला ५ जागा मिळाल्या असून, येथे भारतीय जनता पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला आहे. पाच ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या शिवसेनेला दिंडोरी तालुक्यात ६ जागा मिळाल्या आहेत येथे बहुमतासाठी ७ सदस्य आवश्यक आहे. शिवसेनेचे एक बंडखोर याठिकाणी विजयी झालेले असल्यामुळे त्यांची शिवसेनेला मदत होऊ शकते. निफाड पंचायत समितीत बहुमतासाठी ११ जागांची आवश्यकता असून, या ठिकाणी शिवसेनेने १० जागा मिळविल्या आहेत. येथे आमदार अनिल कदम बहुमतासाठी कोणाला बरोबरच घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
मालेगाव तालुक्यात बहुमतासाठी आठ सदस्यांची गरज असून, याठिकाणी शिवसेना आणि भाजपाला समसमान (६) जागा मिळाल्या असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १ आणि अपक्ष १ या दोन सदस्यांवरच सत्तेची गणिते अवलंबून आहेत.
सटाणा पंचायत समितीत भाजपा (७) सत्तेच्या जवळ असली तरी बहुमतासाठी त्यांना एका सदस्याची जुळवाजुळव करावी लागणार आहे. येथे शिवसेनेचा एक सदस्य असल्याने तालुकास्तरावर सेना-भाजपाची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीच परिस्थिती चांदवड तालुक्यातही आहे. याठिकाणी बहुमतासाठी पाच सदस्य आवश्यक असून, सेना दोन आणि भाजपाकडे तीन सदस्य आहेत. यामुळे या दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला दोन तालुक्यांत बहुमत
शिवसेनेपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला कळवण तालुक्याने तारले असून, येथे राष्ट्रवादीला (६) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नाशिक तालुक्यातही राष्ट्रवादी कॉँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सहा सदस्य संख्या असलेल्या देवळा पंचायत समितीत तीन जागा मिळवून राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी ४ सदस्यांची अवश्यकता आहे. येथे भाजपाला दोन तर शिवसेनेला १ जागा मिळाली असल्याने ऐनवेळी फासे कसे पडतात यावरच सत्तेचे गणित अवलंबून आहे. पंचायत समिती निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचेही उमेदवार होते; मात्र या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. येवला, निफाड, सिन्नर आणि मालेगाव तालुक्यात पक्षाचे उमेदवार होते. एकूण १४ उमेदवारांपैकी दोनच उमेदवारांना चार आकडी संख्येत मते मिळाली आहेत.