पाण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी
By Admin | Updated: December 6, 2015 00:09 IST2015-12-06T00:06:47+5:302015-12-06T00:09:01+5:30
पाण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी

पाण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी
येवला : पालखेड डाव्या कालवाअंतर्गत शेतीसाठी आवर्तन द्यावे , कांद्याचे निर्यातमूल्य कमी करावे आदि मागण्यांसाठी शनिवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन म्हणजे केवळ नौटंकी असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी तहसीलदार शरद मंडलिक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.
शनिवारी शिवसेनेच्या वतीने शेतीला पाणी मिळावे, यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परंतु आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना बाजू मांडण्यासाठी बोलू दिले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शिवसेना जर सत्तेत आहे तर आजचे आंदोलन कोणाच्या विरोधात केले, असा सवाल करून सत्तेत राहून शिवसेना शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या या आंदोलनाचा निषेध म्हणून व शेतीसाठी पाणी मिळावे, कांद्याचे निर्यातमूल्य शून्य व्हावे, यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी (दि. ७) सकाळी ९ वाजता जळगाव नेऊर येथे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको करणार असल्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदनावर बाबा थेटे, सुदाम पडवळ , नवनाथ ठोंबरे, राजू थेटे, विकास ठोंबरे, मच्छिंद्र वारे, साहेबराव ठोंबरे, अनिल ठोंबरे, महेश शिंदे, प्रकाश शिंदे, विलास वारे, मच्छिंद्र ठोंबरे, शरद सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)