शिवसेना विरुद्ध आयुक्त ‘सामना’

By Admin | Updated: January 7, 2016 23:46 IST2016-01-07T23:30:16+5:302016-01-07T23:46:34+5:30

‘कपाट’ प्रकरण : मनपा आयुक्तांच्या हटवादी भूमिकेला सेना देणार प्रत्युत्तर

Shivsena vs. Commissioner 'Samna' | शिवसेना विरुद्ध आयुक्त ‘सामना’

शिवसेना विरुद्ध आयुक्त ‘सामना’

नाशिक : इमारत बांधकामातील ‘कपाट’प्रकरणी शिवसेनेच्या मुखपत्रात महापालिका आयुक्तांवर झालेली टीका आणि त्यानंतर आयुक्तांनी ट्विटरवर नोंदवलेली जळजळीत प्रतिक्रिया यामुळे शिवसेना विरुद्ध आयुक्त यांच्यात आता ‘सामना’ सुरू झाला असून, आयुक्तांनी आपला हटवादीपणा न सोडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. सेनेच्या या पवित्र्यामुळे ‘कपाट’ प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इमारतीत ‘कपाट’च्या माध्यमातून सुमारे एक ते दीड टक्के वाढीव बांधकामाची प्रथा नाशिक शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून दंडात्मक कारवाई करून सदर ‘कपाट’ नियमित करण्याची प्रथा होती. परंतु, सदर प्रथा बेकायदेशीर ठरवत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यास परवानगी नाकारली आहे. सदरचा विषय राज्य शासनाकडेही प्रलंबित आहे. ‘कपाट’ प्रकरणामुळे सुमारे २५०० बांधकामांच्या परवानग्या रखडल्या आहेत. सदर ‘कपाट’ प्रकरणी शिवसेनेच्या मुखपत्रात आयुक्तांच्या भूमिकेविरुद्ध टीका करणारे भाष्य प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्तांनी त्यावर ट्विट करत वादाला आणखी तोंड फोडले. ट्विटरवर आयुक्तांनी जळजळीत प्रतिक्रिया नोंदविल्यानंतर शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांवर टीकास्त्र सोडले.

Web Title: Shivsena vs. Commissioner 'Samna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.