शिवसेनाही करणार गोदावरी आराखडा

By Admin | Updated: August 8, 2014 01:52 IST2014-08-08T01:52:24+5:302014-08-08T01:52:40+5:30

शिवसेनाही करणार गोदावरी आराखडा

Shiv Sena will do Godavari plan | शिवसेनाही करणार गोदावरी आराखडा

शिवसेनाही करणार गोदावरी आराखडा

नाशिक : राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदापार्कच्या विकासाला सुरुवात होत असताना, शिवसेनेनेही या प्रकल्पाला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली असून, राज्यात शिवसेनेची सत्ता आली तर दक्षिण गंगा गोदावरीच्या विकासाचा महाआराखडा तयार करण्यात येईल अशी तरतूद व्हिजन डॉक्युमेंटमध्ये करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे केलेल्या सादरीकरणात ही बाब स्पष्ट केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने व्हिजन डॉक्युमेंट तयार केले असून, त्याचे सादरीकरण गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले, तसेच नाशिकसह राज्यातील तेरा शहरांतील शिवसेना कार्यालयात थेट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या डॉक्युमेंटमध्ये नाशिकच्या दृष्टीने दोन ते तीन मुद्दे समाविष्ट आहेत. त्यात गोदावरी नदीच्या विकासाचा महाआराखडा तयार करण्यात येईल, त्याचप्रमाणे धार्मिक महत्त्व लक्षात घेता नाशिकला ‘रिलिजियस हब’ करण्यात येईल, असे डॉक्युमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्यावेळी राज ठाकरे यांनी गोदापार्क प्रकल्प राबविण्याची तयारी केली होती. नंतर हा प्रकल्प अर्धवट राहिला होता. त्यानंतर आता मनसेची पालिकेत सत्ता आल्यानंतर राज ठाकरे यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून गोदापार्क विकसित करण्यास सुरुवात केली आहे, त्याला व्हिजन डॉक्युमेंटमध्ये एकप्रकारे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
दरम्यान, यावेळी नाशिकच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना नाशिकमध्ये शिवसेनेला अनुकूल वातावरण असून, छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच अन्य विरोधकांना धोबीपछाड देऊ, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले, तर महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनीही शिवसेना संपर्क मोहिमेची माहिती दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena will do Godavari plan