प्रभाग ३० मध्ये शिवसेनेला बसला हादरा

By Admin | Updated: February 4, 2017 23:32 IST2017-02-04T23:31:51+5:302017-02-04T23:32:10+5:30

तिघांचे अर्ज अवैध : एकाच्या उमेदवारीचा उद्या निर्णय; अपक्ष म्हणून लढावे लागणार

Shiv Sena gets queued in Ward 30 | प्रभाग ३० मध्ये शिवसेनेला बसला हादरा

प्रभाग ३० मध्ये शिवसेनेला बसला हादरा

इंदिरानगर : नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ३० मधील शिवसेनेकडून घोषित चारपैकी तीन उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरविण्यात आले, तर एका उमेदवाराच्या अर्जावर सोमवारी (दि.६) सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार आहे. सेनेच्या चारही उमेदवारांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने तिघांची पक्षीय उमेदवारी अवैध ठरविण्यात आली. त्यामुळे संबंधित उमेदवारांना आता अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. सोमवारी चौथ्या उमेदवाराचाही अर्ज अवैध ठरल्यास सेनेचे चारही उमेदवार बाद ठरून त्यांना पक्षचिन्हावर लढता येणार नाही. निवडणुकीपूर्वीच सेनेला हा मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, दुपारी उमेदवार समर्थकांनी प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
महापालिका निवडणुकीसाठी प्राप्त उमेदवारांची छाननी प्रक्रिया शनिवारी सुरू करण्यात आली. प्रभाग क्रमांक ३० मध्ये शिवसेनेने अनुसूचित जातीसाठी नीलेश चव्हाण, ओबीसी महिला प्रवर्गासाठी शकुंतला खोडे, सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी विद्यमान नगरसेवक रशीदा शेख व सर्वसाधारण जागेसाठी नुकतेच सेनेत प्रवेश केलेले नगरसेवक संजय चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र एबी फॉर्मच्या घोळात या चारही उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडली. शिवाय, त्यांच्या एबी फॉर्मवर निळा शिक्का नसल्याने आणि स्वाक्षरीही निळ्या ऐवजी काळ्या पेनने केल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी या चारही उमेदवारांना पक्षचिन्हावर लढता येणार नसल्याचे स्पष्ट केले आणि त्यांची उमेदवारी अपक्ष ठेवली. परंतु, त्यात नगरसेवक संजय चव्हाण यांच्या वकिलांनी उमेदवाराला म्हणणे मांडण्यासाठी सोमवार दि. ६ फेबु्रवारीपर्यंत मुदत मागवून घेतली. त्यानुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी नीलेश चव्हाण, शकुंतला खोडे व रशीदा शेख यांची पक्षीय उमेदवारी अवैध ठरवत त्यांची अपक्ष उमेदवारी कायम केली तर संजय चव्हाण यांच्याबद्दल सोमवारी सुनावणी ठेवली. सोमवारी संजय चव्हाण यांचाही अर्ज अवैध ठरविला गेल्यास प्रभाग ३० मध्ये शिवसेनेचा एकही अधिकृत उमेदवार असणार नाही.  सेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, प्रभाग ३० मधून कॉँग्रेसचे उमेदवार नबाब अकबर शेख यांनीही एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने त्यांना अपक्ष ठरविण्यात आले. प्रभाग २३ मधून समाजवादी पार्टीचे फारुकी रजमी यांनी एबी फॉर्म कोरा जोडल्याने त्यांना अपक्ष ठरविण्यात आले. बहुजन विकास पार्टीचे सरदार शहा फकीर शहा यांच्याही अर्जात त्रुटी आढळून आल्याने त्यांना अपक्ष ठरविण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Shiv Sena gets queued in Ward 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.