शिवसेना-भाजपाचे ‘मिशन १०० प्लस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 22:46 IST2016-06-13T22:44:42+5:302016-06-13T22:46:05+5:30

निवडणुकीचे पडघम : मनसेसह दोन्ही कॉँग्रेस अस्वस्थ

Shiv Sena-BJP's 'Mission 100 Plus' | शिवसेना-भाजपाचे ‘मिशन १०० प्लस’

शिवसेना-भाजपाचे ‘मिशन १०० प्लस’

नाशिक : महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग होणे आता जवळपास निश्चित झाले असून, लवकरच प्रभाग रचनाही घोषित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाने आतापासूनच ढोल वाजवायला सुरुवात केली असून, दोहोंनी स्वबळावर लढण्याचा नारा देत ‘मिशन १०० प्लस’चे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सेना-भाजपाच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी मनसेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आठवडाभरात प्रभाग रचना जाहीर होण्याचे संकेत दिले आहेत. फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत तीनपेक्षा कमी नाही किंवा पाचपेक्षा जास्त नाही, अशारितीने बहुसदस्यीय प्रभाग निश्चित केले जाणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीत सन २०११च्या जनगणनेनुसार १२२ सदस्यसंख्या कायम राहण्याची शक्यता आहे. अवघ्या आठ महिन्यांवर महापालिका निवडणूक येऊन ठेपल्याने भाजपासह शिवसेनेने आतापासूनच रणशिंग फुंकले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात भाजपाकडून मंडलनिहाय ‘विकासपर्व’ या नावाने मेळावे आयोजित केले जात असून, मेळाव्यात प्रमुख प्रतिस्पर्धी शिवसेनाच असल्याचे सांगत ‘मिशन १०० प्लस’चा नारा दिला जात आहे, तर शिवसेनेकडूनही पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांवर जोर दिला जात आहे. शिवसेनेचा येत्या १९ जूनला सुवर्णमहोत्सवी स्थापना दिन असल्याने या दिवशीच निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याची तयारी सुरू आहे. सेनेत मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील नेते-पदाधिकारी व नपा-मनपा सदस्यांच्या प्रवेश सोहळ्याचे संकेत दिले जात आहेत. शिवसेना व भाजपाने आतापासून महापालिका निवडणुकीत आपणच एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याची वातावरणनिर्मिती चालविली असून, सत्ताधारी मनसेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीला दुर्लक्षिले आहे. भाजपाकडून सिंहस्थ कुंभमेळा काळात केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचे भांडवल करत शहराच्या विकासात दिलेल्या योगदानाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला जात आहे. शिवसेनेकडून मात्र भाजपाला लक्ष्य करत केंद्र व राज्य सरकारमधील भाजपाच्या धोरणांवर टीका करत महागाई, पाणी पळवापळवी आदि मुद्दे उपस्थित केले जात आहेत. सेना-भाजपाने स्वबळावर लढण्याचा नारा देण्यास सुरुवात केली असताना मनसेसह कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत शांतता आहे. गोदापार्कसह वनौषधी उद्यानाच्या उद्घाटनासाठी सत्ताधारी मनसेला राज ठाकरे यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा लागून आहे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस गटबाजीमुळे हैराण आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena-BJP's 'Mission 100 Plus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.