शिर्डी, सप्तशृंगीचे दर्शन राहिले बाजूला
By Admin | Updated: October 9, 2015 23:19 IST2015-10-09T23:18:27+5:302015-10-09T23:19:03+5:30
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनालाच लागल्या रांगा

शिर्डी, सप्तशृंगीचे दर्शन राहिले बाजूला
नाशिक : पर्यटनाच्या तीर्थटनाच्या दृष्टीने सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीदरम्यान प्रशासन आणि पर्यटन विभागाने जय्यत तयारी केली खरी, मात्र अपेक्षित भाविकांची गर्दी येऊ न शकल्याने नाशिक, त्र्यंबकेश्वरसह शिर्डी, कावनई, सप्तशृंगगड व अन्य धार्मिक तीर्थस्थळांचे पर्यटन बहुतांशी भाविकांना करता आले नाही. याउलट नाशिकहून त्र्यंबकेश्वर मंदिरात व कुशावर्तात जातानाच भाविकांची दमछाक झाल्याने शिर्डी आणि सप्तशृंगगडाचे दर्शन करण्याची मानसिकता भाविकांमध्ये राहिली नसल्याचे दिसून आले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात स्नानासाठी येणारे भाविक नुसतेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला नव्हे तर त्र्यंबकेश्वरनजीकच्या कावनई तसेच शिर्डी आणि सप्तशृंगगडावरही दर्शनासाठी पर्यटनासाठी जातील, असे गृहीत धरूनच राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाने जादाच्या एस. टी.च्या जादा बसेसची व्यवस्था केली होती. प्रत्यक्षात शिर्डी काय आणि सप्तशृंगगडावरच काय, साधे त्र्यंबकेश्वरला जायालाच तिसऱ्या पर्वणीच्या दिवशी एस.टी. बसेस आणि पर्यायाने भाविक यांना बंदी घालण्यात आल्याने एस.टी.चे नियोजन वाया गेले. त्यामुळे भाविकांना नजीकचे तीर्थस्थळे आणि पर्यटनही करता आले नाही. पहिल्या पर्वणीदरम्यान तर गुजरात व गुजरातमार्गे येणाऱ्या भाविकांना पटेल समाजाच्या आंदोलनामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरला येता आले नाही. तसेही नाशिकहून परत गुजरातला जाताना आधी शिर्डी व नंतर सप्तशृंगगडावर जाऊन देवीचे दर्शन घेऊन जाता जाता सापुताराला पर्यटन करण्याचा भाविकांचा मानस या सर्व गोंधळात कागदावरच राहिला. या उलट नाशिकला कसेबसे रामकुंडावर जाऊन स्नान करीत नाशिक दर्शन करणाऱ्या भाविकांना त्र्यंबकेश्वरला मंदिरात दर्शनासाठी पाच पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या. येथेच खरे म्हणजे भाविकांना तीर्थटन आणि पर्यटन नकोसे झाल्यावर शिर्डी आणि सप्तशृंगगडावर जाऊन दर्शन आणि पर्यटन करण्याचा विचार कुशावर्तात स्नानासाठी हातात घेतलेल्या ओंजळीतील पाण्यासारखा सोडून द्यावा लागला.
तसे पाहिले तर सिंहस्थ कुंभमेळा ही बारा वर्षांतून एकदा येणारी पर्यटन आणि तीर्थटनाच्या अनुषंगाने एक मोठी ‘पर्वणी’ होती, मात्र ढिसाळ नियोजन आणि गलथान आयोजनामुळे भाविकांच्या गर्दीचा आणि पर्यटकांच्या अपेक्षित संख्येचा आकडा त्र्यंबकेश्वरच काय, नाशिकलाही ओलांडता आला नाही, हेही तितकेच खरे म्हणायला
हवे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने शिर्डी आणि सप्तशृंगी देवी ट्रस्टला लाखोे भाविकांच्या रूपाने फार मोठे उत्पन्न येणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरलाच अपेक्षित भाविकांची गर्दी होऊ न शकल्याने प्रशासनावर पहिल्या पर्वणीनंतर टीकेची झोड उठल्यावर दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीदरम्यान ‘बांबू’ बॅरिकेडिंगचे नियोजन कमी करण्यात आले. तेव्हा कुठे भाविकांचे पाय नाशिकला लागले. त्यामुळे या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तीर्थटन आणि पर्यटन या दोन बाबींच्या नियोजनावर प्रचंड मेहनत घेऊनही प्रशासनाला यश येऊ शकले नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.(प्रतिनिधी)
त्र्यंबकेश्वर : माहिती पुस्तिका वाटप
त्र्यंबकेश्वरला पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने बसस्थानकावर एक माहिती कक्ष उघडण्यात आला होता. या माहिती कक्षात महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेली सिंहस्थांवरील माहिती पुस्तिका, शिर्डी आणि सप्तशृंगगडासह जिल्ह्यातील अन्य किल्ले व पर्यटनविषयक माहिती देण्यात आलेली होती. दुर्दैवाने या पुस्तिका वाटपाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही, असेच म्हणावे लागेल
खासगी व्यावसायिकांनी साधली पर्वणी
त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूचा परिसर डोंगर-दर्यांनी नटलेला असून, पावसाळ्यात तर या डोंगरांवरून खळाळत वाहत येणार्या पाण्याच्या नाल्यांना सुंदर धबधब्यांचे स्वरूप प्राप्त होते. याचाच फायदा उचलत खंबाळे, पहिने फाटा, इगतपुरी रस्ता यासह अन्य ठिकाणी खासगी हॉटेल व्यावसायिकांनी टेंट स्वरूपातील फाईव्हस्टार हॉटेल उघडून देशी- परदेशी भाविकांना आकर्षिक केले. तितकाच काय तो व्यवसायवृद्धीला थोडाफार हातभार लागला. परराज्यातील बहुतांश भाविकांनी साधूंच्या आखाड्यातच ठाण मांडल्याने खासगी हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक तसेच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे फारशा भाविकांनी आणि पर्यटकांनी हजेरी लावली नसल्याचे चित्र होते.
दर्शन चोवीस तास
सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून शिर्डी संस्थानने या काळात २४ तासांत भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसाच निर्णय त्र्यंबकेश्वरला मंदिरात ठेवण्यात आला होता; मात्र शिर्डीचा अपवाद वगळता त्र्यंबकेश्वरला पर्वणीच्या आदल्या दिवशी रात्री बारालाच मंदिर बंद ठेवावे लागत होते. तसेच पर्वणीच्या आदल्या दिवशी रात्री आठ वाजेपासूनच ध्वनिपेक्षकावरून भाविकांना दर्शनासाठी रांगा न लावण्याचे आवाहन करावे लागत होते.