शिर्डी संस्थान काळा पैसा पांढरा करण्याचा अड्डा
By Admin | Updated: July 30, 2015 00:34 IST2015-07-30T00:32:57+5:302015-07-30T00:34:02+5:30
शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचा आरोप

शिर्डी संस्थान काळा पैसा पांढरा करण्याचा अड्डा
पंचवटी : महाराष्ट्र शासनाने राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू केला आहे; मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी शिर्डीत का होत नाही? शिर्डी संस्थानला चारही बाजूने विदेशी धन येते. भारतात येणारा हा काळा पैसा असून, शिर्डी संस्थान हे ब्लॅक मनी व्हाइट करण्याचा अड्डा असल्याचा आरोप द्वारका शारदापीठाधिश्वर शंकराचार्य श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
गंगाघाटावरील खिमजी आरोग्य धर्मशाळेत शंकराचार्य यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी पुन्हा शिर्डी संस्थानला ‘टार्गेट’ करून वादाचा मुद्दा उफाळून काढला आहे. साईबाबा हे देवी रूप नाही, तर साईबाबांचे देशासाठी व समाजासाठी काय योगदान आहे असा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या चमत्काराबाबत कोणीच बोलत नाही. संस्थानच्या नावाखाली भाविकांची लूटमार केली जातेच. सिंहस्थासाठी शिर्डी संस्थानने शासनाकडे निधीची मागणी केली आहे; मात्र संस्थानने त्यांचाच पैसा खर्च करावा असे सांगून साईबाबांच्या दैवत्वाबद्दल विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
देशभरात मुस्लिमांसाठी मदरसे आहेत. ख्रिश्चनांसाठी चर्च आहेत मात्र हिंदू मुलांनी धर्माचे शिक्षण कोठे घ्यायचे असा सवाल उपस्थित केला. गोमाता वाचविणे ही काळाची गरज असून शासनाने संपूर्ण देशभरात गोहत्या बंदी करायला पाहिजे. गोदावरी नदीपात्रात दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ झालेली आहे. नदीपात्र दूषित झाल्याने त्याचा अध्यात्म तसेच शरीरावरदेखिल परिणाम होत असून गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजे, असेही शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी शेवटी सांगितले. (वार्ताहर)