शिपाईच झाले अधिकारी
By Admin | Updated: June 10, 2016 00:07 IST2016-06-09T23:30:22+5:302016-06-10T00:07:44+5:30
मनपा सिडको विभागीय कार्यालयातील प्रकार

शिपाईच झाले अधिकारी
नरेंद्र दंडगव्हाळ सिडको
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील जन्म-मृत्यू विगाभाची नोंद ठेवणाऱ्या अति महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या पाच महिन्यांपासून सहायक अधीक्षकच नसल्याने त्यांचे कामकाज हे शिपाई करीत आहे.
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात एक खिडकी, घरपट्टी, पाणीपट्टी, अतिक्रमण, विविध कर, भुयारी गटार आदि विभागांबरोबरच सिडको भागातील व्यक्तीचा जन्म झालेल्या व मृत्यू झालेल्यांची नोंद करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम जन्म-मूत्यू या विभागात होत असते. या विभागात सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची गेल्या जानेवारी महिन्यात बदली झाली. यानंतर या ठिकाणी लगेच दुसरे अधीक्षक रुजू होण्याची गरज होती, परंतु यास सुमारे पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही दुसरे कोणी अधिकारी आले नसल्याचे समजते.
सहायक अधीक्षक जरी नसले तरी या विभागाचे काम मात्र थांबलेले नसल्याचे दिसून येत आहे. परंतु जन्म व मूत्यू झालेल्यांची नोंद ही योग्य पद्धतीने झाली आहे ंिकंवा नाही याबाबत लिपिकांनी घेतलेल्या नोंदी तपासून शहानिशा करण्यासाठी याठिकाणी सहायक अधीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून हे कामकाज याठिकाणी काम करणारे शिपाई, कर्मचारी हे त्यांचे काम करण्याबरोबरच सहायक अधीक्षकांचीही कामे करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. अर्थात शिपाई जर सहायक अधीक्षकांचीही कामे बघत असेल व यात काही चूक झाल्यास यास कोण जबाबदार राहील याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या विभागात दोन लिपिक, चार शिपाई कामकाज करीत असल्याचे दिसून येत आहे. इतर विभागाच्या तुलनेत या विभागाचे काम हे अत्यंत महत्त्वाचे असतानाही शिपाई करीत आहे. या विभागाबरोबरच एक खिडकी विभागातही लिपिकांच्या जागेवर महिला शिपाईच कामकाज करीत असल्याचे दिसून येते.