लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे रशीद शेख, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची निवड झाली. या पदाधिकारी निवडणुकीत राष्ट्रवादी - जनता दलाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. एमआयएमने निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली.महापौरपदाची निवडणूक बुधवारी (दि.१४) झाली. महापौरपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. नबी अहमद यांना राष्ट्रवादी व जनता दल आघाडीच्या २७ व भाजपाच्या ७ अशा ३४ नगरसेवकांनी मतदान केले. रशीद शेख यांना कॉँग्रेसचे २८ व शिवसेनेच्या १३ अशा ४१ नगरसेवकांनी मतदान केले. पिठासीन अधिकाऱ्यांनी कॉँग्रेसचे रशीद शेख यांना महापौरपदी विजयी घोषित केले. उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे सखाराम घोडके, राष्ट्रवादी कॉँग्रेस - जनता दल आघाडीचे मन्सूर अहमद यांच्यात सरळ लढत झाली. घोडके यांना कॉँग्रेसची २८ व शिवसेनेची १३ अशी ४१ मते मिळाली. आघाडीचे अहमद यांंचा १४ मतांनी पराभव झाला. (सविस्तर वृत्त : हॅलो)मनपाच्या इतिहासात शिवसेनेला आजपर्यंत उपमहापौरपद मिळाले नव्हते. सखाराम घोडके यांच्या रूपाने पहिल्यांदाच ही संधी मिळाली आहे. शिवाय केंद्रात व राज्यात भाजपाच्या सत्तेचा वारू चौफेर उधळत असताना शिवसेना व कॉँग्रेसने युती करून भाजपाच्या घोडदौडला लगाम घातला आहे.
महापौरपदी कॉँग्रेसचे शेख, उपमहापौरपदी सेनेचे घोडके
By admin | Updated: June 14, 2017 23:53 IST