कोथिंबिरीचे भाव गडगडल्याने उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:14+5:302020-12-04T04:39:14+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाची प्रत्येक हंगामाने सत्त्वपरीक्षा घेतली आहे. आता नगदी भांडवल मिळून देणारे म्हणून कोथिंबीर पिकाकडे पाहिले ...

कोथिंबिरीचे भाव गडगडल्याने उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाची प्रत्येक हंगामाने सत्त्वपरीक्षा घेतली आहे. आता नगदी भांडवल मिळून देणारे म्हणून कोथिंबीर पिकाकडे पाहिले जाते. परंतु सध्या कोथिंबिरीला कवडीमोल भाव मिळाल्याने उभ्या पिकांत मेंढ्या सोडल्याचा प्रकार परिसरातील म्हेळुस्के येथे घडला. मागील हंगामात कोणत्याही पिकांनी बळीराजाला साथ मिळाली नाही. आता तरी झालेले नुकसान भरून निघेल व पिकांसाठी भांडवल तयार होईल या आशेपोटी दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के येथील शेतकरी जितेंद्र अनंता बोराटे यांनी नगदी भांडवल मिळवून देणारे पीक म्हणून कोथिंबीर पिकाची निवड केली. एकरी ३० हजार याप्रमाणे दीड एकर क्षेत्रासाठी ४५ हजार रुपयांचे भांडवल अडकवून कोथिंबिरीची लागवड केली. अगोदरचा कालखंड जर सोडला तर नंतर मात्र कोथिंबीर पिकाला चांगला हमीभाव मिळालाच नाही. जवळ ठेवलेले सर्व भांडवल खर्च करून हातात कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे उभ्या पिकात मेंढ्या सोडण्याची वेळ आली. बाजारपेठेत एक रुपयाला दोन ते तीन जुडी मिळत आहेत. त्यामुळे ग्राहक वर्ग खूश आहे, तर आपण केलेल्या कष्टाला योग्य फळ न मिळाल्याने शेतकरीवर्गाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत.
दिंडोरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महागाचे बियाणे खरेदी करून तसेच मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज व भांडवल उपलब्ध करून हे पीक घेतले. परंतु भाव न मिळाल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. रब्बी हंगामात कोथिंबिरीने निराशा केल्याने आता पुढे काय, अशी समस्या शेतकऱ्यांसमोर आ वासून उभी राहिली आहे.
शासन हमीभाव देत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, तो कोणत्याही पिकांत केलेल्या कष्टाचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या डोंगराखाली गाडला जात आहे. तेव्हा जगाचा पोशिंदा शेतकरी जर जिवंत ठेवायचा असेल तर शेतकरीवर्गाच्या प्रत्येक पिकाला शासनाने हमीभाव द्यावा.
- जितेंद्र बोराटे, शेतकरी, म्हेळुस्के
===Photopath===
031220\03nsk_22_03122020_13.jpg
===Caption===
लखमापूर परिसरातील म्हेळुस्के येथील कोथिंबीरीच्या उभ्या पिकात सोडलेल्या मेंढ्या.०३ लखमापूर १