श्रावणी सोमवारी ‘नो हाफ डे’
By Admin | Updated: August 18, 2015 00:09 IST2015-08-18T00:04:45+5:302015-08-18T00:09:07+5:30
प्रथेला पायबंद : मनपा कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका

श्रावणी सोमवारी ‘नो हाफ डे’
नाशिक : दरवर्षी श्रावणी सोमवार म्हटला की, महापालिकेचे कामकाज केवळ अर्धा दिवसच चालायचे. उपवास सोडण्यासाठी ही सुटी दिली जायची, असे म्हटले जाते. ही प्रथा कोणी आणि केव्हा पाडली याची कुणाला माहिती नाही आणि ही दोन तासांची सुटी कधी ‘हाफ डे’ मध्ये परावर्तित झाली हे सुद्धा नकळत घडत गेले. आता वर्षानुवर्षांपासून चाललेल्या या प्रथेला आयुक्तांनी पायबंद घातला असून, यापुढे श्रावणी सोमवारी ‘नो हाफ डे’ असे म्हणत कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. आयुक्तांच्या या निर्णयाने भलेही कर्मचाऱ्यांना ‘उपवास’ लागला असेल; परंतु
महापालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे.
नाशिक महापालिकेत दरवर्षी श्रावण महिन्यातील चारही सोमवारी सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत कामकाज चालविले जायचे आणि दुपारी ४ वाजेनंतर कर्मचाऱ्यांना श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी सुटी दिली जायची. सदर प्रथा ही नगरपालिका काळापासून चालत आल्याचे सांगितले जाते. परंतु श्रावणी सोमवारी काही कामचुकार कर्मचाऱ्यांकडून दुपारी १ वाजेनंतरच मुख्यालय सोडले जायचे. त्यामुळे श्रावणी सोमवारी कर्मचारी ‘हाफ डे’च गृहीत धरत आले आहे.
श्रावणी सोमवारी महापालिका मुख्यालय असो वा विभागीय कार्यालये याठिकाणी दुपारनंतर कामकाज ठप्प होत असे. त्यामुळे दुपारनंतर नागरी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अर्धा दिवसच कामकाज चालत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागे. परंतु, ही पडलेली प्रथा आजवर कोणीही बंद करण्याचे धाडस केले नव्हते.
प्रथेप्रमाणे यंदाही श्रावणी सोमवारी ‘हाफ डे’ सुटीची फाईल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे आली असता तेही अचंबित झाले. आयुक्तांनी सदर फाईल परत माघारी पाठवून देत ‘नो हाफ डे’चा पवित्रा घेतला. त्यामुळे श्रावणातील पहिल्या सोमवारी दुपारी ४ वाजेनंतर सुटीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची निराशा झाली. यापुढे आता श्रावणी सोमवारी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कामकाज करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)