शरद पवार येणार : महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

By Admin | Updated: August 24, 2016 00:53 IST2016-08-24T00:41:16+5:302016-08-24T00:53:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे

Sharad Pawar will come: The runway of the candidates seeking municipal elections | शरद पवार येणार : महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

शरद पवार येणार : महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

नाशिक : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मरगळ आलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा व शहर अध्यक्ष बदलाचे वारे पुन्हा वारे वाहू लागल्याचे वृत्त असून, मध्यंतरीच्या काळात शहराध्यक्ष बदलावर पक्षश्रेष्ठींनीच पडदा टाकलेला असल्यामुळे येत्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असलेले पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पुढ्यातच जिल्हाध्यक्षपदाचा फैसला होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर येऊन गेलेले पक्षनिरीक्षक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तसे संकेत दिले असून, त्यामागे जिल्हाध्यक्षांवर असलेली पक्षाची नाराजी कारणीभूत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कांद्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर कांदा फेक करावी असे आदेश दीड महिन्यापूर्वीच आव्हाड यांनी दिले होते, परंतु ग्रामीण राष्ट्रवादीने त्याकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे आव्हाड यांचे आदेश अव्हेरल्याची भावना व्यक्त केली गेली, त्यामुळेच की काय दोन दिवसांपूर्वी आव्हाड यांना पुन्हा ‘कांदा फेको’चे स्मरण करून द्यावे लागले. या शिवाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांच्या बाह्या फुरफुरू लागल्या आहेत. त्यात माजी आमदार दिलीप बनकर, माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे नाव अग्रेसर आहे. बनकर यांच्या पत्नी सध्या जिल्हा परिषदेच्या सदस्य असून, पाच वर्षांत त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाची मशागत करण्यासाठी बनकर यांना पक्षपदाची आस असल्याचे त्यांच्या समर्थकांकरवी सांगितले जात आहे. जिल्हाध्यक्षपदाबरोबरच शहराध्यक्षपदाचे खांदेपालट होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी शहराध्यक्ष बदलासाठी सरसावलेले पदाधिकारी शांत झाले असून, विद्यमान शहराध्यक्षांनी पक्ष श्रेष्ठींकडे केलेली शिष्टाई यशस्वी झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे, तसे असले तरी, ऐनवेळी पक्ष काय निर्णय घेतो ते सांगता येणार नाही.

Web Title: Sharad Pawar will come: The runway of the candidates seeking municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.